
एसएसपीयु, एससीडीएलतर्फे शिक्षकांसाठी राष्ट्रीय परिषद
पुणे, ता. ३१ : सिंबायोसिस स्कील ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) आणि सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एससीडीएल) यांच्यावतीने शिक्षकांसाठी ‘इनोव्हेटिव्ह टीचिंग ॲण्ड लर्निंग थ्रू टेक्नॉलॉजी’ विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद विद्यापीठात येत्या शनिवारी (ता. ३) होणार आहे.
शिक्षकांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बदलेली शिक्षणपद्धती, ऑनलाइन शिक्षण, शिकविताना डिजिटल यंत्रणांचा वापर अशा महत्त्वपूर्ण बदलांना सामोरे जावे लागत आहे. हे बदल शिक्षकांना सहजतेने स्वीकारता यावे, या उद्देशाने ही परिषद आयोजित केली आहे. परिषदेत विविध चर्चासत्रे, परिसंवाद, कौशल्य कार्यशाळा होणार आहेत. तसेच ‘शिक्षणातील अध्यपन निष्पत्ती’, कौशल्य विकासासाठी नावीन्यपूर्ण प्रशिक्षण’ विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. व्हर्च्युअल क्लासेस कसे आयोजित करावे, शिक्षणाच्या प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मुक्त शैक्षणिक संसाधने विषयांवरही चर्चा होणार आहे.परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ‘https://forms.gle/H3ptm1Yanr2WhYjL6’ संकेतस्थळावर नावनोंदणी करावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.