
भाऊ आणि पुतण्याला सात वर्षे सक्तमजुरी
पुणे, ता. ३१ : जनावरे चारण्यावरून झालेल्या वादात वहिनीला शिवीगाळ केल्याबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या भावावर कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाऊ आणि पुतण्याला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.
किसन सुखदेव दुर्गे (वय ६१) आणि त्याचा मुलगा माधव दुर्गे (वय ३१, दोघेही, रा. दुर्गे वस्ती, निमोणे, ता. शिरूर) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. बाळासो सुखदेव दुर्गे हे या घटनेत जखमी झाले होते. त्यांची आई ताराबाई दुर्गे यांनी याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळासो आणि किसन हे दोघे भाऊ आहेत. दोन नोव्हेंबर २०१२ रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणात सहायक जिल्हा सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी सात साक्षीदार तपासले. जखमी आणि फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलिस निरीक्षक ए. बी. जगदाळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, पुणे सत्र न्यायालय पैरवी अंमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचीत आणि न्यायालय पैरवी कर्मचारी पोलिस रेणुका भिसे, एस. बी. रणसर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. घटनेच्या एक दिवस आधी सामाईक क्षेत्रात जनावरे चारताना किसन आणि बाळासो या दोघांच्या पत्नीत शाब्दिक वाद झाले. याचा जाब विचारण्यास बाळासो गेले होते. त्यावेळी किसन त्याने त्यांना मारहाण केली. तर माधव हा कुऱ्हाड घेऊन गेला. कुऱ्हाडीने वार करून त्यांनी बाळासो यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.