
Pune : नाट्यगृहांची कामे ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण करणार; चंद्रकांत पाटील
पुणे : ‘‘बालगंधर्व रंगमंदिर व शहरातील अन्य नाट्यगृहांची सद्यःस्थिती काय आहे, तेथे कोणत्या अडचणी आहेत, याबाबत कलाकार व प्रेक्षकांची महापालिका प्रशासनाकडून बैठक घेऊन त्या जूनअखेरपर्यंत समजून घेतल्या जातील. त्यानंतर ऑगस्टअखेरपर्यंत शहरातील सर्व नाट्यगृहांची देखभाल, दुरुस्ती व अन्य कामे पूर्ण केली जातील,’’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
शहरातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहासह इतर नाट्यगृहांची अवस्था दयनीय आहे. कलाकार व प्रेक्षकांना तेथे मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. असे असूनही महापालिका प्रशासनाकडून नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची स्थिती आहे.
नाट्यगृहांसंबंधीचा प्रश्न वारंवार उपस्थित करूनही महापालिका प्रशासन ढिम्म असल्याच्या तक्रारी प्रेक्षकांकडून केल्या जात आहे. त्याबाबत कलाकार, प्रेक्षकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या प्रश्नाची पालकमंत्री पाटील यांनी गांभीर्याने दाखल घेत महापालिका प्रशासनाची गुरुवारी तातडीने बैठक घेतली. या वेळी महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
याबाबत पाटील म्हणाले, की शहरातील वेगवेगळ्या नाट्यगृहांतील समस्या मागील काही दिवसांपासून कलाकार व प्रेक्षक यांच्याकडून माझ्यापर्यंत येत होत्या. त्यामुळे नाट्यगृहांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, यादृष्टीने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नाट्यगृहांमध्ये सध्या काय समस्या आहेत, या संदर्भात महापालिका प्रशासनाची बैठक घेतली.
यामध्ये जूनअखेरपर्यंत बालगंधर्व, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, गणेश कला क्रीडा रंगमंच व अन्य नाट्यगृहांबाबत कलाकार, प्रेक्षक यांच्याशी बोलून त्यांना काय अडचणी आहेत, हे नोंद करून घेण्यास सांगितले आहे. त्यानंतर तत्काळ अंदाजपत्रक तयार करून, निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावसाळ्यामध्ये नाट्यगृहांमध्ये नाटकांचे खेळ तुलनेने कमी असतात. त्यामुळे याच कालावधीमध्ये नाट्यगृहाची कामे मार्गी लावता येतील. त्यादृष्टीने जुलै महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून पावसाळ्यात कामे सुरू होतील. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांश नाट्यगृहांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री