असून अडचण, नसून खोळंबा!

असून अडचण, नसून खोळंबा!

पुणे, ता. २ ः सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी समोर आल्या आहेतच. पण रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना खड्डे, पसरलेली खडी, चुकीच्या पद्धतीने झालेले डांबरीकरण याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या पावसाळ्यात खड्ड्यांना सामोरे जावे लागणार आहे.

डेक्कन किंवा स्वारगेटकडून खडकवासला, धायरी, नऱ्हे, वडगाव, किरकटवाडी या भागात जाण्यासाठी सिंहगड रस्ता हा एकमेव सोईचा मार्ग आहे. गेल्या काही वर्षापासून या रस्त्यावरील वाहतूक मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने कोंडी होत आहे. त्याला पर्याय म्हणून राजाराम पूल ते फन टाइम थिएटर असा दोन हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जात आहे. त्यासाठी ११८.३७ कोटी रुपये खर्च येणार आहे. गेल्या दीड वर्षापासून या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, आत्तापर्यंत सुमारे ४३ टक्के काम पूर्ण झालेले आहे.

असा बसतो फटका...
या उड्डाणपुलाचे काम करताना अतिक्रमण काढणे, अरुंद रस्त्यावर नोपार्किंग करणे, रस्ते सुस्थितीत ठेवणे, सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या लावून वरून लोखंडी वस्तू खाली पडू नये यासाठी काळजी घेणे या कामाची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि महापालिकेची आहे. पण याकडे दुर्लक्ष होत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असले तरी रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याने गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीत भर पडते. त्यातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहतूक मंदावत आहे.

कुठे काय स्थिती?
- माणिकबाग येथे ब्रह्मा व्हेज हॉटेल ते पेट्रोलपंपार्यंतचा दोन्ही बाजूचा रस्ता सर्वाधिक खराब आहे. तेथे काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले पण रस्ता खचणे, समपातळीत नसणे, पॅचवर्क योग्य न केल्याने खड्डे पडल्यासारखीच स्थिती आहे. रस्त्यावर खडी पसरली आहे. त्याचा त्रास दुचाकीस्वारांना होत आहे.
- माणिकबाग ते संतोष हॉल दरम्यान स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सिमेंटच्या रस्त्यावर डांबर व खडी टाकल्याने ती निघून जात आहे. पसरलेली खडी पावसाळी चेंबरवर आल्याने हे झाकण ब्लॉक झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
- संतोष हॉल चौकात रस्ता क्रॉसकट करण्यात आला, पण तो बुजविताना योग्य पद्धतीने काम न केल्याने एकप्रकारचा गतिरोधक निर्माण झाला आहे.


पथदिवेही बंद
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना माणिकबाग भागातील पथदिवे बंद आहेत. काही आधीच रस्ता खराब असताना दुसरीकडे पथदिवे बंद ठेवल्याने हा रस्ता धोकादायक आहे. रात्री उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे.

उड्डाणपुलाचे काम सुरू आहे याचा अर्थ तेथील रस्त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे आहे का? चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविणे, डांबर टाकणे यामुळे पूर्वीपेक्षा जास्त त्रास होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी चांगल्या दर्जाचे काम करून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा.
- संदीप जोशी, धायरी

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना तेथील रस्त्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात प्रकल्प विभागाचे अधिकाऱ्यांना सांगून हा रस्ता चांगला करून घेतला जाईल.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त

आकडे बोलतात...

११८.३७ कोटी
उड्डाणपुलासाठी खर्च

--------------------------
२१२० मीटर
उड्डाणपुलाची लांबी
----------------------------
१६.३ मीटर
उड्डाणपुलाची रुंदी
-------------------------------
३६ महिने (पावसाळा सोडून)
कामाचा कालावधी
----------------------------
४३ टक्के
मे २०२३ अखेर पूर्ण झालेले काम
-------------------------------------------------------------------

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘जो आमच्याशी चांगला वागेल त्याच्यासाठी आम्ही खूपच चांगले आहोत, आमच्याशी प्रेमाने वागणाऱ्या माणसाला आम्ही कोणतीही मदत करण्यासाठी सदैव तयार असतो. एखाद्याला मदत करायचे ठरवले तर आम्ही लंगोटी काढून सुद्धा देऊन परंतु आमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला फटके द्यायला देखील आम्ही मागेपुढे बघत नाही.’’ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हा उपदेश लक्षात ठेवावा. जनता गप्प आहे, काय करणार, चालायचंच, दोन दिवस ओरडतील...असं मानून वागणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. गेले कित्येक महिने सिंहगड रस्त्यावरील समस्या दूर होण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. याबाबत आपले अनुभव व सूचना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com