बोपोडीतील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा

बोपोडीतील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा

औंध, ता. २५ ः जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणास अनेक वर्षांपासून अडथळा ठरत असणाऱ्या बोपोडी येथील एका इमारतीसह ६३ घरांवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात केलेल्या कारवाईमध्ये घरे पाडून रस्ता रुंदीकरणामधील अडथळा दूर करण्यात आला. दरम्यान, कारवाई झालेल्या घरांच्या मालकांना महापालिकेकडून यापूर्वीच नुकसान भरपाईसह पुनर्वसन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हॅरिस पुलापर्यंतचे पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी झालेले आहे. मात्र पुणे महापालिकेच्या हद्दीत बोपोडी येथे काही घरे, इमारती रस्ते रुंदीकरणाच्या कारवाईमध्ये अडथळा ठरत होती. परिणामी संबंधित ठिकाणावर रस्ता अरुंद होऊन वाहतुकीचा वेग मंदावत होता. त्याचबरोबर सकाळी व सायंकाळी ऐन रहदारीच्यावेळी बोपोडी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी प्रयत्न केला जात असतानाच पर्यायी घरे, नुकसान भरपाई अशी वेगवेगळी कारणे पुढे करून काही नागरीकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी विलंब झाला होता. प्रशासनाने रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या घर व दुकान मालकांना भरपाई तसेच काहींना पर्यायी घरे दिल्यानंतरही काही मिळकतधारक भूसंपादनास विरोध करत असल्याने रुंदीकरणाचा प्रश्‍न रखडला होता.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी सकाळी सात वाजता मोठ्या पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाईला सुरुवात झाली. चौकातील दुमजली इमारतीसह लगतच्या ६३ मिळकती जमीनदोस्त केल्या. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. या कारवाईमध्ये साडेचार हजार चौरस मीटर जागा ताब्यात घेतली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त विकास ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, पालिकेच्या भूमीप्रापण विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, उपअभियंता दिनकर गोजारे, महिंद्रकर, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त खलाटे यांच्यासह ५० अधिकारी, ७५ बिगारी आणि ४५० पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

‘‘जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी चौक ते दूध डेअरीपर्यंतच्या खडकी कॅन्टोंन्मेट बोर्डच्या हद्दीतील रस्ता रुंदीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू केले. बोपोडी चौकातील भूसंपादन झालेल्या जागेपर्यंत रस्ता रुंदीकरण झाले आहे. मात्र, काही मिळकती ताब्यात नसल्याने बोपोडी चौकातील काम रखडले होते. गुरुवारी भूसंपादनाची कारवाई करण्यात आली. कारवाई सुरु असतानाच रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही प्राधान्य देण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.’’ -विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

कारवाईमुळे वाहतूक कोंडीत भर
बोपोडी चौकात महापालिकेच्या पथकाकडून गुरुवारी दिवसभर भूसंपादनाची कारवाई सुरु होती. त्यामुळे दिवसभर व रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अनेक नागरीकांना या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com