वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे!
वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे!

वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे!

sakal_logo
By

पुणे, ता. ८ :
वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळवीती
येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुणदेाष अंगा येत...
या अभंगातून जगतगुरू संत तुकाराम महाराज यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटून सांगितले. या अभंगातून प्रेरणा घेऊन जिल्हा प्रशासनाने पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबरच पालखी तळावरही हिरवा गार केला जाणार आहे.
ग्रामीण भागात पालखी मार्गावर तसेच पालखी तळावर सावली राहावी, या हेतूने जिल्हा प्रशासनाने यंदा हरित वारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत येत्या पावसाळ्यात पालखी मार्गावर व पालखी तळावर सुमारे १० हजार देशी झाडे लावण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभाग यांच्यावतीने ही झाडे लावण्यात येणार आहे. केवळ झाडांची लावून नाही, तर त्यांचे संगोपन व्यवस्थित व्हावे, यासाठी प्रत्येक झाडाचे पालकत्व दिले जाणार आहे. त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांची मदत घेतली जाणार आहे.
श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यातून जातात. ग्रामीण भागात या दोन्ही पालखी मार्गावर आणि पालखी विसाव्या ठिकाणी सावली राहावी, तसेच या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण आणि महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने झाडे लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद, महामार्ग प्राधिकरण आणि वन विभाग यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत हरित वारी हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वड, पिंपळ, चिंच आदींचा समावेश
पावसाळ्यात दहा हजार देशी झाडे लावण्यात येणार आहे, यामध्ये वड, पिंपळ, चिंच आदींचा समावेश आहे. साधारणपणे दोन वर्षे वय असलेली झाडे लागण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही झाडे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन विभागाने घेतली आहे. आवश्‍यकतेनुसार सामाजिक वनीकरण विभागसुद्धा झाडांची रोपे उपलब्ध करून देणार आहे. तसेच जो विभाग झाडे लावेल त्या विभागाकडे झाडे जगविण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच काही सामाजिक संस्थांनी झाडे जगविण्याची तयारी दर्शविली आहे.

यंदाच्या वर्षी वारीच्या निमित्ताने ‘हरित वारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालखी तळ आणि मार्गावर दहा हजार झाडे जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभाग यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे