
महापालिकेकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
पुणे, ता. १० : शहरात एकीकडे जी २० परिषदेची बैठक, पालखीचे होणाऱ्या आगमनासाठी महापालिकेची जोरदार तयारी सुरु असतानाच, दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस स्वच्छतेसाठी झटत असताना बेजबाबदार नागरिक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व अस्वच्छता करणाऱ्या ४०० जणांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे पावणे दोन लाख रुपयांपर्यंतचा दंडही वसुल केला आहे.
शहरात दुसऱ्या टप्प्यावर जी २० परिषदेअंतर्गत सोमवार (ता. १२) ते बुधवार (ता. १४) दरम्यान बैठक होत आहे. त्यास ८० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शहरामधील प्रमुख रस्ते, चौक, भिंती येथे स्वच्छता, वृक्षारोपण, रंगरंगोटी अशी विविध प्रकारची कामे महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत. त्यातच सोमवारी (ता. १२) संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन होत आहे. जी २० बैठक व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी मागील एक महिन्यापासून रात्रंदिवस काम करीत आहेत, असे असतानाही काही बेजबाबदार नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका करण्यापासून अनेक प्रकारे अस्वच्छता पसरवीत असल्याचे निदर्शनास येत आहे, अशा बेजबाबदार नागरिकांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली. यात ६ ते ९ जून दरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ७१ जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ४६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर याच कालावधीमध्ये ३२९ जणांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली, त्यामुळे त्यांच्याकडून एक लाख १६ हजार रुपये महापालिकेने दंड घेतला आहे. दोन्हींमध्ये सुमारे एक लाख ६२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
‘‘सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व अस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाई सुरुच आहे. शहरात पालखी व जी २० परिषद बैठक होत आहे. त्याचबरोबर स्वच्छ शहराच्या स्पर्धेतही आपण सहभागी आहोत, असे असतानाही काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा किंवा अस्वच्छता करण्याचा प्रकार करतात. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून कारवाई वेगात सुरु आहे.
-आशा राऊत, प्रमुख, घनकचरा विभाग, पुणे महापालिका
तारीख /थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई /अस्वच्छता कारवाई
६ जून/०६/५२
७ जून/२१/१२५
८ जून/१८/८१
९ जून/२६/७१
एकूण/७१/३२९