
सृजनशीलता जोपासण्यासाठी स्पर्धा फायदेशीर
पुणे, ता. २२ ः चित्रकला म्हणजे मुलांच्या अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम. अनेकदा अबोल असणारी मुले देखील आपल्या भावना चित्र आणि रंगांद्वारे उत्तमरीत्या व्यक्त करतात. मुलांची सर्जनशीलता खुलवण्याची आणि जोपासण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होते. नावीन्यपूर्ण आविष्कारातून त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडते. त्यामुळे ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’सारख्या स्पर्धा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अतिशय फायदेशीर आहेत, अशी भावना विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केली.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे गेल्या ३७ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारी भव्य ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ रविवारी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये उत्साहात पार पडली. स्पर्धेचे एक केंद्र असलेल्या पी. जोग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ डेव्हिड म्हणाल्या, ‘‘चित्रकलेमुळे मुलांना आपल्या अंगभूत गुणांचे प्रदर्शन करण्यासाठी वाव मिळतो. त्यांचे विचार आणि भावना त्यांनी रेखाटलेल्या चित्रातून समोर येतात. मुलांमधील सर्जनशीलतेला यामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळते आणि याही पलीकडे जात, कलेद्वारे त्यांना मिळणार निखळ आनंद, ही सर्वात मौल्यवान गोष्ट असते. आमच्या केंद्रावर स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धा संपल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदच स्पर्धेचे यश दर्शविणारा होता.’’
अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर नगरकर यांनीही याच आशयाचा अनुभव सांगितला. ‘मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळणे गरजेचे असते. कलेसंबंधी आयोजित विविध उपक्रमांतूनच त्यांच्या सृजनशक्तीचा विकास होतो. मुलांना या माध्यमातून नवनिर्मिती करायला मिळते, ज्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो. आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे अशा स्पर्धा अतिशय आवश्यक असतात’, असे त्यांनी सांगितले.
एका ठिकाणी बसून एकाग्रतेने आणि संयमाने काम करण्याची सवय, जी गोष्ट हाती घेतली आहे, ती पूर्णत्वास नेण्याचा निर्धार, त्यासाठी चिकाटीने प्रयत्न, अशा अनेक गोष्टी कलेच्या माध्यमातून मुलांमध्ये नकळत रुजत जातात. कोणत्याही दडपणाशिवाय स्वतःला मुक्तपणे अभिव्यक्त करण्याची संधी कलेमुळे मुलांना मिळते. अहंकाराचा वारा दूर ठेवण्यासाठी, आपल्या भावना नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठीही ललित कलांचा उपयोग होतो.
- अनघा मुजुमदार-पंडित, मानसोपचारतज्ज्ञ