
पेटीएममधून कर्ज काढून आजारी मित्राची फसवणूक
पुणे, ता. २२ ः मानसिक आजारी असलेल्या मित्राचे दोन मोबाईल आपल्याकडे घेऊन त्यातील पेटीएम पासवर्डचा वापर करून एकाने १५ हजार रुपयांचे कर्ज काढत आजारी मित्राची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिश कन्हैय्यालाल परिमो (रा. परमार गार्डन, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मित्राच्या वडिलांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबर २०२० ते ८ एप्रिल २०२२ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिश हा फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र आहे. फिर्यादी यांचा मुलगा हा मानसिक आजारी आहे. त्याचा गैरफायदा घेऊन अनिशने त्याच्याकडील ५५ हजारांचे दोन मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन त्याचा अपहार केला. त्याच्या नकळत अनिशने त्याच्या पेटीएम पासवर्ड नंबर मिळवून परस्पर पेमेंट बॅंकमधून १५ हजारांचे कर्ज प्राप्त केले. ते मिळालेले पैसे त्याने मुंबई आणि बेंगलोर येथे खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यासंबधीचा अर्ज त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे दिल्यानंतर चौकशीत हा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.