दिवाळी अंक
स्वागत दिवाळी अंकाचे
-----------------------
१) नवल
रहस्यकथा, भयकथा, विज्ञानकथा, नवलकथा, चातुर्यकथा अशा विविध कथा प्रकारांचे अनोखे विश्व या अंकातून खुले झाले आहे. इतिहासानुभव या विभागात बोरोबुद्दूरचे अद्भुत बौद्ध स्मारक यावर दीपा मंडलिक यांनी लिहिलेला माहितीपूर्ण लेख उत्कंठावर्धक आहे, तर तिबेटमधील किंतूप या दुर्लक्षित नायकाविषयी अनुराग लव्हेकर यांनी लिहिलेला लेख अतिशय रोचक आहे. अमोल साडे यांचा ‘जिद सी जिंदणं’ हा महाराजा रणजीत सिंग यांची पत्नी जिंदन कौर यांच्या आयुष्यावरील लेखही वाचनीय आहे. अतिलघुकथा म्हणजे ‘अलक’ हा नवा गद्य कथाप्रकार आता लोकप्रिय झाला असला तरी याचा उदय कसा झाला, याची रोचक माहिती र. कृ. कुलकर्णी यांच्या लेखात मिळते. ‘आपुलीच प्रतिमा’ ही नंदू मुलमुले यांची गूढकथा गुंतवून टाकते. नोबेल चोरी ही विलास गीते यांची कथाही एक वेगळे विश्व समोर आणते. पूनम छत्रे यांची विचित्र नेमानेम, मियाओच्या सीईओच्या मुलाच्या ऑडिओ डायरीची काही पाने असे लांबलचक नाव असलेली आशिष महाबळ यांची कथा सुरवातीपासून मनाचा ठाव घेते. यासह अनेक दर्जेदार कथांनी भरगच्च असलेला हा दिवाळी अंक वाचकांची उत्तम साहित्याची अपेक्षा पूर्ण करणारा आहे.
संपादक : अभिराम अंतरकर, पाने २७२, किंमत : ४५० रुपये
२) ‘संवाद’ दहावी व बारावी दिवाळी अंक
दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी करावी, यासाठी संवाद प्रकाशन संस्थेने राज्यभरातील नामांकित शाळा व तेथील शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीने हे अंक प्रकाशित केले आहेत. मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमासाठी तर बारावी विज्ञानसाठी स्वतंत्र असे चार अंक प्रसिद्ध केले आहेत. या अंकांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरातील पुर्नलिखित उत्तरपत्रिका जशाच्या तशा प्रसिद्ध केल्या आहेत. या उत्तरपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका कोठे होतात ? नेमके उत्तर कसे लिहावे, उत्तरपत्रिका लिखाणाची शैली कशी असते, तसेच महत्त्वाचे म्हणजे बोर्डाची पेपर तपासणी पद्धती कशी असते, या साऱ्या गोष्टींचे आकलन होते. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या मनोगताद्वारे यशाचे कानमंत्र, अभ्यासाच्या पद्धती, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनपर लेख, उत्तरपत्रिका लिखाणाचे कानमंत्र, सराव प्रश्नपत्रिका, उत्तम आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आदी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश या अंकात केला आहे.
संपादक ः विजय कोतवाल, प्रत्येकी ः ५०० रुपये
३) क्रिककथा
क्रिकेटप्रेमींसाठी हा दिवाळी अंक विशेष पर्वणी आहे. ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’चा प्रवास अंकात मांडला आहे. असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पर्धा, सामने तसेच विविध उपक्रमांची माहिती यात दिली आहे. या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखांची मांडणी क्रिकेटच्या सामन्यप्रामाणे केली आहे जसे की टॉस, पॉवर प्ले, मिडल ओव्हर्स, स्लॉग ओव्हर्स, लंच ब्रेक, मैदानाबाहेर अशा विभागात लेखांची मांडणी केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा, क्रिकेटचा इतिहास, कथा, प्रत्यक्ष अनुभव यावर लिखाण वाचायला मिळेल. कौस्तुभ चाटे, अद्वैत सोवळे, ओंकार मानकामे, विलास गोडबोले, सुधीर भालेराव, अमोल शिंदे, सोनिया डबीर, पराग फाटक, विजय लोकापल्ली, हर्षद चाफळकर, मनीषा कोल्हटकर, प्रसन्न कुलकर्णी, अतुल गद्रे, संकेत कुरुलकर, अश्विनी जंगम, मृण्मयी रानडे आदी लेखकांचे लेख अंकात आहेत.
कार्यकारी संपादक : कौस्तुभ चाटे, पाने : १९३ , किंमत : ३०० रुपये
------------------------------------------------------------------
४) गोंदण
यंदाच्या अंकात संस्कृती, संस्कार, साहित्य, कला-क्रीडा आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे मराठी भाषा आणि वाड्मयावरील लेख प्रामुख्याने समाविष्ट केले आहेत. साहित्य-संस्कृतीचा आदर्शवाद राजकीय, संत साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन, आदिवासी संस्कृती, ‘मराठी भाषा अभिजात झाली, पुढे काय?’, मराठी साहित्याचा प्रवाह आणि वाटचाल, तमाशा आणि परिवर्तनवादी कला, वाचवा पर्यावरण वसुंधरेचे, भारतीय स्त्री यासह
विविध विषयांवरील कविता वाचायला मिळतील. डॉ. श्रीपाल सबनीस, आनंद देशमुख, दिलीप फलटणकर, राजेंद्र घावटे, शिवाजी काळे, अर्चना बोरावके आदी लेखकांचे लेख, तर सुमीर लुंकड, उषा वराडे, महादेव साने, जयंत जोगळेकर यांच्या कविता आहेत.
संपादक : पांडुरंग गाडीलकर, पाने : १५२ , किंमत : २०० रुपये
------------------------------------------------------------------
५) थिंक पॉझिटिव्ह
आपल्या अवती-भवती आपआपल्या परीने जीवन जगणारी, चांगली कामे करणारी अनेक माणसे असतात. मात्र, त्यातील फार थोड्या लोकांचा आपल्यावर प्रभाव पडतो. अशी माणसे इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचं काम करीत असतात. त्यांना प्रसिद्धीची आस अजिबात नसते. त्यामुळे बऱ्याचदा ते पडद्यामागे राहतात. अशा ‘अनसंग हिरों’वर प्रकाश टाकण्याचं काम यंदा ‘थिंक पॉझिटिव्ह’च्या दिवाळी अंकाने केलं आहे. सुमारे १५० लेखकांनी आपले अनुभव अंकात मांडले आहेत. त्यात प्रामुख्याने गुरुदेव श्री श्री रविशंकर, अभय जोशी, प्रवीण दवणे, दीपा देशमुख, डॉ. श्रीमंत कोकाटे, ऐश्वर्य पाटेकर, मंजिरी तिक्का, श्रीराम पचिंद्रे, किशोर ढगे, नीलिमा नांदुरकर, पराग पोतदार, पूर्णिमा वाळुंज यांचा समावेश आहे.
मुख्य संपादक : यमाजी मालकर, पाने : १५२, किंमत : २५० रुपये
----
६) प्रसाद
प्राचीन प्रागैतिहासिक काळापासून आजच्या काळापर्यंत पुण्याचा आढावा अंकात घेतला आहे. पुरातत्त्वीय इतिहास, शिवकाल, पेशवाई, चित्रे, संग्रहालये, विद्यानगरी, मंदिरे, देवता, गणेशोत्सव, पेठा, पुण्याची जडणघडण, कलानगरी पुणे, खाद्यसंस्कृती, पुणेरी बाणा, संग्रहालये, अशा कैक विषयांचा धांडोळा अंकात घेण्यात आला आहे. डॉ. मंजिरी भालेराव, सौरभ मराठे, डॉ. रवींद्र ठिपसे, अतुल तळाशीकर, डॉ. अंजली पर्वते, सुप्रसाद पुराणिक, डॉ. भाग्यलता पाटसकर, डॉ. ज्योत्स्ना खरे, राजू इनामदार, मोहन शेटे, आनंद सराफ आदींच्या लेखनाने अंक सजलेला आहे. पुण्यात वास्तव्य करणाऱ्या मूळ पुणेकर असणाऱ्या आणि पुण्याची ज्यांना ओढ आहे, अशा सर्वांसाठी हा अंक वाचनीय ठरणार आहे.
संपादक : उमा बोडस, पाने : २२४ , किंमत : २६० रुपये
------------------------------------------------------------------
७) अंबर
वैचारिक लेख, सुरेख लघुकथा, स्फुटे, कविता, व्यंगचित्रे, वर्ष भवितव्य, शब्दकोडे अशा वौविध्यपूर्ण साहित्याने अंक नटला आहे. प्रतिष्ठा-श्रमाची माणसाची - विजय कुवळेकर, नाती घरातल्या घरात हरवलेली - प्रवीण दवणे, मोठी माणसे, छोटी मने - अरविंद गोखले, स्वराभिनयाचे शिलेदार - मुकुंद संगोराम, महात्मा गांधीजींची निर्भय पत्रकारिता - वासुदेव कुलकर्णी, अर्थहीन की अर्थपूर्ण कादंबरी - जयंत जोर्वेकर, समर्थांचे सांगीतिक विचारसौंदर्य - जयराम पोतदार, निवृत्तीचा काळ सुखाचा - सुतेजा दांडेकर, मावळ तालुक्याचा दुर्ग इतिहास - प्रमोद बोराडे, हिमशिखरावरील स्वर्गीय अनुभूती देणारा बाली पास ट्रेक - कामिनी जोशी, थोडसं हसा - गिरीश भागवत आदी वाचनीय लेखांची पर्वणी या अंकात वाचकांना मिळणार आहे.
संपादक : सुरेश साखवळकर, पाने : २४४, किंमत : २०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

