वाहनतळ ठेकेदारांवर ठोस कारवाई नाहीच
पुणे, ता. १२ ः महापालिकेच्या वाहनतळांवर नागरिकांची अक्षरशः लूट केली जात असतानाही, महापालिका प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. राजकीय दबावामुळे महापालिका ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
शहरातील महापालिकेच्या वाहनतळावर नागरिकांकडून जादा शुल्क घेण्याबरोबरच नागरिकांशी हुज्जत घालण्याबरोबरच त्यांना दमदाटी, मारहाणीसारखे प्रकार वारंवार घडत असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार ‘सकाळ’ने महापालिकेच्या वाहनतळांची पाहणी करून व नागरिकांना येणाऱ्या अनुभवांची, तक्रारींची गांभीर्याने दखल घेत ‘आर्थिक लुटीचा तळ’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शेकडो नागरिकांनी वाहनतळांबाबतच्या तक्रारी ‘सकाळ’कडे केल्या होत्या.
यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ‘‘महापालिकेकडून ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ठेकेदारांवरील कारवाई, उपाययोजना व नियमावलीवर काम सुरू आहे,’’ असे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहनतळाच्या ठेकेदारांवर ठोस कारवाई करण्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर अजूनही ठोस व कडक कारवाई करण्याबाबत प्रशासन गंभीर नाही.
महापालिका प्रशासनाकडून वाहनतळांच्या ठेकेदारांवर कारवाई केली जाणार आहे. याबरोबरच काही उपाययोजनाही केल्या जाणार आहे. त्याबाबतचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.
- दिनकर गोजारे, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, पुणे महापालिका

