हलक्या पावसाची शहरात हजेरी कमाल तापमानात किंचित घट
पुणे, ता. २० : गेल्या तीन ते चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी (ता. २०) हजेरी लावली. त्यामुळे कमाल तापमानातदेखील किंचित घट नोंदविण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस हवामानात फारसा बदल होणार नसून, हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहर आणि परिसरात रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारी बारानंतर वातावरणात अचानक बदल होऊन, हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. रविवारी शहरात २९.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तर २१.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. पुढील काही दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसून, कमाल तापमान स्थिर राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
पुणे आणि परिसरात सोमवारी (ता. २१) कमाल तापमानात किंचित वाढ होणार असून, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस इतके, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता. २१) कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार असून आकाश अंशतः ढगाळ राहून, अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
-----------
फोटो ः 32920