मोफत बेड उपचार सुविधेला मिळेना गती
वर्षभरात केवळ ११७ रुग्णांवर उपचार, चार खासगी रुग्‍‍णालयांत सुविधा

मोफत बेड उपचार सुविधेला मिळेना गती वर्षभरात केवळ ११७ रुग्णांवर उपचार, चार खासगी रुग्‍‍णालयांत सुविधा

Published on

पुणे, ता. २० : गरीब रुग्‍णांवर सवलतीच्‍या दरांत किंवा मोफत उपचारांच्‍या अटीवर (फ्री बेड) महापालिकेने शहरातील चार खासगी रुग्‍णालयांना अतिरिक्‍त मजले बांधकाम करण्‍याची परवानगी दिली. मात्र, या योजनेबाबत सर्वसामान्‍यांना माहिती नसल्‍याने त्‍या योजनेद्वारे गरीब नागरिक उपचारांपासून वंचित राहत आहेत. गेल्‍या वर्षभरात हजारो नागरिकांवर उपचार होण्‍याऐवजी केवळ ११७ रुग्‍णांना मोफत उपचार मिळाले आहेत.
अनेक वर्षांपासून रूबी हॉल क्लिनिक, सह्याद्री रुग्‍णालय डेक्‍कन, औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍स, औंध (एम्‍स) व कोरेगाव पार्क येथील के. के. आय इन्स्टिट्यूट या चार रुग्णालयांमध्ये ‘फ्री बेड’ योजना राबवली जात आहे. त्‍यांच्‍याकडे ठराविक उपचार व ठराविक खाटा गरीब रुग्‍णांसाठी आरक्षित ठेवल्‍या जातात. मात्र, याबाबत महापालिकेकडून पुरेशी जनजागृती होत नसल्‍याने रुग्‍ण उपचार घेण्‍यात कमी पडतात. त्‍यातच रुग्णालयांची उदासीनता असल्यामुळे योजनेचा पुरेपुर वापर होत नसल्‍याचे दिसून येते.
महापालिकेने शहरातील या चार खासगी रुग्णालयांना अतिरिक्त ०.५ मजला क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिलेला आहे. या बदल्यात त्यांनी गरीब रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे बंधन घालण्यात आले होते. या योजनेतून राखीव खाटांवरील रुग्णांना सह्याद्री रुग्‍णालयात ५ खाटा व रूबीमध्‍ये १२ खाटांवर मोफत व अत्यल्प दरांत वैद्यकीय उपचार, ‘एम्‍स’ मध्‍ये ५० टक्‍के सवलतीत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी आणि केके आय इन्स्टिट्यूट येथे दोन खाटांच्‍या माध्‍यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत देण्याची अट आहे.
सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्‍या मते या योजनेतून चारही रुग्णालयांमध्ये वर्षभरात ६ हजार दिवस (रुग्णाच्या उपचाराचा कालावधी) इतक्‍या खाटा राखीव ठेवल्‍या जाणे अपेक्षित आहे. मात्र, १ एप्रिल २०२४ ते ३१ मे २०२५ या कालावधीत केवळ ११७ रुग्णांनाच या योजनेचा लाभ झाला आहे. महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्‍हणाले, ‘‘या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्‍ण पुणे शहरातील रहिवासी आणि त्याच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून त्‍याला शिफारसपत्र दिले जाते. महापालिकेकडून चार रुग्णालयांमध्ये दिली जाणारी ‘फ्री बेड’ सुविधा पूर्ण कार्यक्षमतेने राबवली जात आहे. अद्याप एकाही रुग्णाने रुग्णालयाकडून सेवा नाकारण्याची तक्रार केलेली नाही.
-----
चौकट
चार रुग्णालयांतील लाभार्थींची संख्या:
रुग्‍णालयाचे नाव – उपचार घेतलेले रुग्‍ण – उपचारांचे स्‍वरूप

रूबी हॉल क्लिनिक : ३१ – शस्त्रक्रिया वगळता फक्त वैद्यकीय व्यवस्थापन सेवा

सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन ः ४२ – शस्त्रक्रिया वगळता फक्त वैद्यकीय व्यवस्थापन सेवा

एम्स हॉस्पिटल, औंध : १४ – अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी उपचारांत ५० टक्‍के सवलत

इनलॅक्स बुधराणी के. के. आय इन्स्टिट्यूट: ३० – मोतीबिंदू शस्त्रक्रिया
------
‘‘मोफत उपचारांबाबत नागरिकांना या योजनेबाबत माहिती नाही व आरोग्य विभागाकडून आणि रुग्णालयाकडून याबाबत माहिती दिली जात नाही. या प्रकरणाची चौकशी करून गरीब व गरजू रुग्णांसाठी ३६५ दिवस या चारही रुग्णालयांमधील मोफत बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी सक्षम यंत्रणा उभी करायला हवी. जेणेकरून या योजनेमध्ये जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ मिळेल.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com