
बचत गटांच्या माध्यमातून गावागावांत रोजगार निर्मिती
पुणे, ता. २५ : महिला बचत गटांच्या माध्यमातून गावागावांत रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प पुणे जिल्हा परिषदेने केला आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात उत्पादन प्रकल्प उभारणी केली जाणार आहे. यामुळे बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात आधीपासून राबविण्यात येत असलेल्या एक गट, एक उत्पादनावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यामुळे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळून बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास हातभार लागू शकणार आहे. यानुसार पुणे जिल्ह्यात महिला शेतकरी आणि बचत गटांच्या माध्यमातून ७१ कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. या कंपन्यांसाठी राज्य सरकार, जिल्हा परिषदांमार्फत निधी आणि विविध बॅंकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदरातील कर्जरूपी भांडवल उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण राज्य सरकारने सुरु केले आहे. त्यासाठी बचत गटांतील महिलांना शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या उमेद उपक्रमांतर्गत ‘महाजीविका अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाची सुरवात जागतिक महिलादिनी केली आहे.
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी २०२२-२३ हे वर्षे उपजीविका वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यामध्ये उपजीविका व विपणन (व्यापार) या विषयावर अधिक भर देण्यासाठी नवीन महाजीविका अभियान सुरु केले आहे. यासाठी ग्रामीण भागातील महिलांना गाव पातळीवर विशेष कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अशी करणार रोजगार निर्मिती
१) महिला बचत गटांना आत्मनिर्भर करणार.
२) बचत गटांचे हॉटेल उद्योगासोबत समन्वयन करणार.
३) एक बचत गट, एक उत्पादन तयार करण्यावर अधिक भर देणार.
४) महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे ब्रॅंडींग आणि पॅकेजिंग करणार.
उत्पादन प्रकल्पांची उद्दिष्टे
- ग्रामीण भागातील विविध उत्पादनांची ओळख निर्माण करणार
- या उत्पादनांना फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध करून देणार
- कच्च्या मालाच्या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उत्पादन वाढविणार.
- बचत गटांची उत्पादन कार्यक्षमता वाढविणार
- बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची गुणवत्ता सुधारणार.
- रोजगार निर्मिती करण्यासाठी बचत गटांना उत्पादन प्रकल्पांसाठी आर्थिक भांडवल उपलब्ध करून देणार.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावागावांत रोजगार निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३९ कोटी ६१ हजार ५०० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय, विविध बॅंकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदराने सुमारे २०० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
- आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
Web Title: Todays Latest Marathi News Pzp22b00709 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..