तरी न्हायी धीर सांडला...खेळ मांडला!

तरी न्हायी धीर सांडला...खेळ मांडला!

सकाळ वृत्तसेवा
शिरूर, ता. ३० : एका-दोघांच्या नव्हे तर तब्बल सहाजणांच्या अपघाती मृत्यूने आमदाबाद (ता. शिरूर) येथील साळवे वस्ती अद्याप सावरली नसली; तरी मृतांचे दुःख बाजूला ठेवून जखमींना वाचवायच्या तळमळीने वस्तीतील तरुणांबरोबरच आमदाबादकर सरसावले आहेत. जो जमेल तशी आर्थिक मदत गोळा करीत असला तरी ती तुटपुंजी ठरणार असल्याने अचानक आलेल्या अपघाती संकटातून सावरण्यासाठी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
या अपघातात विजय अवचिते, मयूर साळवे, राजेंद्र साळवे, धीर मोहिते, समाधान साळवे व ओंकार गोरखे यांचा मृत्यू झाला तर संदीप साळवे, गुरुनाथ साळवे, अक्षय साळवे, प्रतीक साळवे, प्रदीप साळवे व टेम्पोचालक खंडू नरवडे यांच्यावर अद्याप नगरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. त्यांच्या देखरेखीसाठी अनेकजण अद्याप नगरलाच आहेत. त्यामुळे नगरला असलेल्यांचे फोन आले आणि मोबाईलवर त्यांचे नाव किंवा नंबर दिसले तरी साळवे वस्तीतील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.
दरम्यान, नगर येथे उपचार चालू असलेल्या सर्वच जखमींची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रशांत जाधव यांनी आम्हा ग्रामस्थांना सांगितल्याची माहिती राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन थोरात यांनी दिली.
अपघातग्रस्तांना सहकार्य करताना, स्थानिक ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला असल्याचे स्थानिक कार्यकर्ते संदीप शेंडगे यांनी सांगितले. जखमींवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी म्हणून पाठपुरावा चालू आहे. ती मदत मिळेलही. परंतु, धीरज मोहिते या बारा वर्षीय मुलासह जे तरुण या अपघातात मृत्युमुखी पडले. ते सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांचा मुख्य आधारस्तंभ होते व त्यांच्या जिवावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालू होता. त्या कुटुंबांच्या चरितार्थाचा प्रश्न उभा राहिला असल्याचे शेंडगे यांनी नमूद केले.

देवस्थानकडे मदतीची मागणी
जखमींना उपचारखर्च मिळावा म्हणून पाठपुरावा चालू असल्याचे माजी सरपंच योगेश थोरात व प्रकाश थोरात यांनी सांगितले. शासकीय मदतीबरोबरच दानशूरांकडून मदतीची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अपघातग्रस्त कुटुंबांना सावरण्यासाठी शासकीय मदत मिळावी, अशी मागणी आमदाबाद सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक माशेरे यांनी केली. लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी मृत तरुणांच्या कुटुंबाला शनी शिंगणापूर, देवगड, शिर्डी देवस्थानने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

शेवटी शिंगाड वाजलेच नाही...
या अपघातातील मृत मयूर साळवे हा शिंगाड वाजविण्यात वाकबगार होता. गुरुवारी (ता. २३) कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात शिंगाड वाजविण्यासाठी मयूर याला प्राचार्य अनिल शिंदे यांनी निमंत्रित केले होते. पण त्या दिवशी त्याचा मोबाईलही उचलला जात नव्हता. अखेर कार्यक्रम संपला तरी मयूर आलाच नाही. आली ती त्याच्या अपघाती मृत्यूची खबर. प्राचार्य अनिक शिंदे यांनीच ही आठवण सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com