
सबनीसांचे लेखन समाजाला मार्गदर्शक शां. ब. मुजुमदार यांचे प्रतिपादन; दोन पुस्तकांचे प्रकाशन
सदशिव पेठ, ता. १७ : ‘‘महापुरुषांच्या विचारांची बेरीज केली पाहिजे, त्यानेच सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर होईल. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा आपला वारसा जोपासला पाहिजे,’’ असे मत सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी बुधवारी येथे केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यावर आधारित ‘श्रीपाल सबनीस विचारधारा’ आणि ‘श्रीपाल सबनीस प्रारूप व विचारधारा’ या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी साहित्यिक विश्वास पाटील, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, संस्कृती प्रकाशनच्या अध्यक्षा सुनीताराजे पवार, महाराष्ट्र कलाप्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी सबनीस म्हणाले, ‘‘संवाद आणि संघर्ष हे माझ्या जीवनाचे सूत्र आहे. चांगल्याशी संवाद आणि वाईटाशी संघर्ष केला पाहिजे. सर्व धर्मांतील चांगुलपणा स्वीकारून आपण पुढे गेले पाहिजे.’’ डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘सबनीस स्पष्टवक्ते आहेत. लेखनातून त्यांनी कायम सामाजिक बांधिलकी जपली. मानवकेंद्री समाज घडण्यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे. परिघावरील लोकांच्या व्यथा, समस्या त्यांनी मांडल्या.’’ पवार यांनी प्रास्ताविक केले. ईटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले.
सबनीसांनी आपल्या लेखनातून समाजाला खेचून घेतले आहे. समाजाला दिशा देण्याचे काम ते करीत आहेत. पुस्तकाच्या माध्यमातून विवेकाचा जागर करण्याचे कार्य अव्याहतपणे ते करीत आहेत.
- विश्वास पाटील, साहित्यिक