फॉक्सकॉनच्या स्थलांतराने उद्योजकांच्या समस्या चव्हाट्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फॉक्सकॉनच्या स्थलांतराने उद्योजकांच्या समस्या चव्हाट्यावर
फॉक्सकॉनच्या स्थलांतराने उद्योजकांच्या समस्या चव्हाट्यावर

फॉक्सकॉनच्या स्थलांतराने उद्योजकांच्या समस्या चव्हाट्यावर

sakal_logo
By

गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. १५ : वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला स्थलांतरित झाला. मात्र यानिमित्ताने एमआयडीसीच्या तळेगाव-चाकण औद्योगिक पट्ट्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. कोट्यवधींचा महसूल सरकारला देणाऱ्या आणि लाखो हातांचा रोजगार असणाऱ्या लघु, मध्यम आणि अवजड उद्योग क्षेत्रालाच सुविधांची वानवा आहे. अखंडित वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांसाठी साऱ्यांना झगडावे लागत आहे.

स्थानिकांचा विरोध, इतर राज्यांच्या तुलनेत भरमसाठ वीजेचे दर, एमआयडीसी प्रशासनातील खाबुगिरी आणि सुविधांची वानवा यामुळे महाराष्ट्रातील अनेक उद्योग यापूर्वीही इतर राज्यांत स्थलांतरित झाले आहेत. आता सरकारच्या अनास्थेपायी वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याला पोटभरू एमआयडीसी प्रशासन आणि उद्योजकांना सापत्नभावाची वागणूक देणारे सरकारच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया तळेगाव-चाकण एमआयडीसीतील बहुतांश उद्योजकांनी दिली. डॉलरमधील परकीय चलनाच्या नुसत्या अवास्तव घोषणा करून, सरकार प्रस्थापित लघु, मध्यम उद्योजकांच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष करते. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीची भावना आहे. उद्योजकांच्या सेवा, सहकार्यासाठी सदा तत्पर असलेल्या इतर राज्यांतील औद्योगिक विकास मंडळांशी तुलना करता एमआयडीसी प्रशासन उद्योजकांना किरकोळ कामांसाठी खेटे घालावयास लावते. एमआयडीसी कार्यालयात दलाल आणि एजंटांचा सुळसुळाट झाला आहे.परवानग्या आणि भूखंड मिळविण्यासाठी उद्योजकांना आपली कामे सोडून अधिकारी एजंटांचे पाय धरावे लागतात. उद्योजकांच्या सोयीसाठी आणि सुलभ प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड तसेच वाकडेवाडी येथील एमआयडीसी प्रशासनाची कार्यालये तळेगाव अथवा चाकण औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित करावीत, अशी मागणी जोर धरते आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावरील नित्याच्या वाहतूक कोंडीवर पर्याय उपाय म्हणून खालुंब्रे ते खराबवाडी दरम्यानचा रस्ता एमआयडीसी प्रशासनाने विकसित करावा, अशी उद्योजकांची मागणी आहे.

एमआयडीसीतील समस्या
-अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
- मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना
- तळेगाव-चाकण रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी
- वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा
- वाहनतळाअभावी रस्त्यावर अवजड वाहनांचे पार्किंग
- स्थानिक कंत्राटदार आणि गावगुंडांचा त्रास
- एमआयडीसी प्रशासनाकडे घालावे लागणारे खेटे
- कौशल्य विकास केंद्राअभावी कुशल मनुष्यबळाची कमतरता

तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक-१,२
- एकूण औद्योगिक आस्थापना : २८+
- मूळ उपकरणे निर्माता (ओईएम) :३+
- पूरक पुरवठादार कंपन्या : २२+

चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक- १, २, ३
- एकूण औद्योगिक आस्थापना : ७५०+
- मूळ उपकरणे निर्माता (ओईएम) : १००+
- पूरक पुरवठादार कंपन्या : ५००+
- सेवा क्षेत्रातील कंपन्या : १००+

दृष्टीक्षेपात ठळक घडामोडी
- २०१० : शिंदे वासुली (ता.खेड) येथील डाऊ केमिकल प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द
- २०११ : हिरानंदानी समूहाचा नवलाख उंबरे येथील २५०० मेगावॉटचा औष्णिक वीज प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द
- २०२१ : आर्थिक तोट्याचे कारण दाखवत तळेगाव एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपनीचा प्रकल्प बंद
- २०२२ : स्वारस्य दाखवलेल्या चीनमधील ग्रेट वॉल मोटर्सकडून जनरल मोटर्सचा बंद प्रकल्प विकत घेण्याबाबत नकार
- २०२२ : वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला स्थलांतरित

--
सरकारने महाराष्ट्राची औद्योगिक पत राखावी
पायाभूत सुविधांबाबत एमआयडीसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही सरकार आणि एमआयडीसी प्रशासन दखल घेत नाही, असा आरोप फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. ते म्हणतात, ‘‘इतर राज्यांच्या तुलनेत वीज दर खूप जास्त आहेत. तरीही उद्योगांना अखंडित पुरवठा मिळत नाही. प्रशासकीय आणि आस्थापन विषयक कामे करताना उद्योजकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. जवळपास सहा राज्यांइतका महसूल एकट्या तळेगाव चाकण एमआयडीसीकडून सरकारला मिळतो, तरीही उद्योजकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची वानवा आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे या अगोदरही महाराष्ट्रातील बऱ्याच कंपन्या इतर राज्यांत गेल्या आहेत. सीमेवरील औद्योगिक वसाहतींमधील लघु, मध्यम उद्योजक कमी दराने वीज देणाऱ्या शेजारील कर्नाटक, गुजरातेत गेले. आता वेदांता फॉक्सकॉन गेली. यावरून तरी सरकारने बोध घेऊन महाराष्ट्राची औद्योगिक पत राखावी.’’
--
कोट
डाऊ केमिकल आणि हिरानंदानी यांचे प्रकल्प पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने या प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध अपेक्षित होता. मात्र, फॉक्सकॉनसारख्या प्रकल्पांसाठी स्थानिक भूमिपुत्र स्वागतोत्सुक होते.
- दत्तात्रेय पडवळ, माजी सरपंच, नवलाख उंबरे, मावळ
----------
फोटो ः ९१७०१

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02955 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..