
सोमय्या पाच दिवसांत जेलमध्ये जाणार ः संजय राऊत
हडपसर, ता. ५ : दोन दिवसांत आरोपपत्र दाखल होऊन पुढील पाच दिवसांत किरिट सोमय्या जेलमध्ये जाणार असल्याचा दावा करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत
विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
ज्यांना पंधरावर्षे भोंग्याचा त्रास झाला नाही, त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्रास सुरू झाला आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेना ठरवेल. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम करावे, अशी टीकाही त्यांनी राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
शिवसेना हडपसर मतदारसंघाच्या वतीने खासदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर मेळावा घेण्यात आला. या वेळी त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
राऊत म्हणाले, ‘‘आम्ही कोणाला घाबरत नाही. ठाकरे सरकार कोरोनापासून सर्व आजारांवर उपचार करणारे आहे. हा महाराष्ट्र बहुजन समाजाचा आहे. छत्रपती शिवरायांचा, शाहु, फुले, आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे. शिवसेनेचा प्रवास गल्ली ते दिल्ली आहे. शिवसैनिकाच्या खांद्यावरील भगवा हा बाळासाहेबांनी दिलेला ओरिजनल आहे. आज लोकं पेटवापेटवीची भाषा करतात. ‘सवाल यह है की बंदर के हात माचिस किसने दी?’ पण कसे काय पेटणार, त्यासाठी आतून आग आणि मनगटात रग असावी लागते.’’
भोंग्यांचे राजकारण सध्या सुरू आहे. बाळासाहेबांनी मुस्लिम बांधवांसाठी जागा उपलब्ध करून देत रस्त्यावरील नमाज बंद केले.
आपण जेव्हा समस्या निर्माण करता, तेव्हा त्यावरील उपायही देणे गरजेचे आहे. भोंगे प्रकरणात या लोकांनी आमच्या हिंदूंचाच गळा आवळला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, हे लोकांना सांगा. अयोध्येत बाबरी पाडण्याचे काम शिवसैनिकांनी केले. आमच्याकडे छत्रपती आणि तुमच्याकडे औरंगजेब जन्माला आले हे विसरू नका. शिवसेनेला संपविण्याच्या दिल्लीतून सुपाऱ्या दिल्या जातात, असा आरोपही त्यांनी केला.
पालिका निवडणुकीचा संदर्भ देत खासदार राऊत यांनी आता केवळ मुंबई, ठाणे नाही, तर पुणेही जिंकायचे आहे. सावधपणे पावले टाकण्याची गरज आहे, अशी सूचनाही शिवसैनिकांना दिली.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे महाराष्ट्र अस्वस्थ करत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात, आदित्य ठाकरे हे मर्चिडीस बेबी आहे. त्यांचे म्हणणे असे असेल तर तुमचा हडपसर येथील एक माणूस मर्चिडीस चोर आहे.
या वेळी संपर्कप्रमुख सचिन आहीर, आदित्य शिरोडकर, शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतरे, जिल्हाप्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे, संजय मोरे, समीर तुपे, राजेंद्र बाबर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची अल्हाट, संगीता ठोसर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Upn22b21805 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..