
समर्थ पोलिसांच्या पथकाकडून सराईत गुन्हेगाराला जेरबंद
मुंढवा, ता. १८ ः अठरा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा, खुनाचा प्रयत्न केलेल्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून जेरबंद केले. उदय जितेंद्र लोखंडे (२२ वर्षे) रा. केशवनगर मुंढवा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २१ मध्ये रहीम शेख (वय २४ रा. सदानंद नगर मंगळवार पेठ) याच्यावर सहा जणांनी धारदार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील १८ महिन्यांपासून फरार असणारा आरोपी हा केशवनगर येथील शिंदे वस्ती येथे आपल्या आई-वडीलांना भेटायला येणार आहे. त्यांनी ही माहिती पोलिस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांना कळविली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे व पोलिस निरिक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक हेमचंद्र खोपडे व तपास पथकातील हेमंत पेरणे, सुभाष पिंगळे, श्याम सूर्यवंशी, रहीम शेख, प्रमोद जगताप, जितेंद्र पवार, गणेश वायकर, दत्तात्रेय भोसले, लखन शेटे हे खासगी वाहनाने केशवनगर येथे पोचले. त्यांनी परिसरात सापळा रचून लोखंडे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल असून, एक वर्षासाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार देखील केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Upn22b22721 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..