पार्किंग ठेकेदाराकडून तिप्पट वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्किंग ठेकेदाराकडून तिप्पट वसुली
पार्किंग ठेकेदाराकडून तिप्पट वसुली

पार्किंग ठेकेदाराकडून तिप्पट वसुली

sakal_logo
By

कात्रज, ता. २१ : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या पार्किंगमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना ठेकेदाराच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. चारचाकीसाठी तासाला १४ रुपये शुल्क असताना तब्बल ३० रुपये वसूल केले जात आहेत. तर दुचाकीला ३ रुपयांऐवजी १० रुपये शुल्क आकारले जाते. या ठेकेदाराविरोधात महापालिकेने ठोसे कारवाई केली नसल्याने त्याला मोकळे रान मिळाले आहे.

कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर मार्चमध्ये प्राणी संग्रहालय चालू झाल्यापासून साडेसात लाखांहून अधिक पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली आहे. यातून महापालिकेला अडीच कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. वाघ, सिंह, हत्ती, रानमांजर, वाघाटी, शेकरु, अस्वल, गवा यांच्यासह वेगवेगळ्या प्रजातीचे साप आणि अन्य वन्यजीव प्राणी संग्रहालयात पाहायला मिळतात. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी महापालिकेने राजीव गांधी वाहनतळाची सोय केलेली आहे. हे वाहनतळ खासगी ठेकेदारांकडून चालविले जात आहे. महापालिकेने ठेकेदारांसोबत केलेल्या करारामध्ये दुचाकीसाठी तासाला तीन रुपये आणि चारचाकीसाठी १४ रुपये दर निश्चित केलेला आहे. एवढेच पैसे ठेकेदाराने घेणे बंधनकारक आहे. परंतु, ठेकेदाराच्या कामावर महापालिका अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने लूटमार सुरु असल्याचे दिसून येते.

अशी होते लूटमार

प्राणिसंग्रहालयात आलेल्या पर्यटकांकडून वाहनांसाठी शुल्क म्हणून दुप्पट तिप्पट वसुली करण्यात येते. त्यामुळे पर्यटकांना अधिकचा आर्थिक भुर्दंड होतो. दुचाकी पार्किंग केल्यास पहिल्या तासाप्रमाणे ३ रुपये आकारणी करणे गरजेचे असताना थेट पाच तासाचे म्हणून १० रुपये आकारले जातात तर, चारचाकीसाठी एक तासाच्या नंतर पाच-दहा मिनीट झाले तरी जास्तीचे ३० रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे. चारचाकी वाहनांसाठी वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती देण्यात येत नाही. एखाद्या पर्यटकाने ती आवर्जून मागितलीच तर तिच्यावर शुल्काची रक्कम न टाकता केवळ तारीख आणि वेळ नमूद असलेली पावती दिली जाते.

ना दरपत्रक ना तक्रार क्रमांक

महापालिकेसोबत केलेल्या करारात पार्किंगच्या ठिकाणी मोठ्या अक्षरात दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. तसेच, तक्रारीसाठी क्रमांक लिहणे आवश्यक आहे. पंरतु पार्किंगच्या जागेत कुठेही दरपत्रक किंवा तक्रार क्रमांक दिलेला नाही. नागरिकांनी शुल्काबाबत विचारणा करताच ठेकेदाराच्या माणसांकडून दादागिरी करत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे कुटुंबासमवेत आलेले पर्यटक नाईलाजास्तव निमूटपणे निघून जातात, असा वारंवार अनुभव येत आहे.

पार्किंगच्या ठेकेदाराने नियमांनुसार शुल्क आकारणे बंधनकारक आहे. पार्किंगच्या ठिकाणी तपासून करून ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल.- कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

मी प्राणी संग्रहालयात गेलो असता माझे प्राणी संग्रहालयाचे तिकीट पाहून सव्वा तासासाठी ६० रुपये शुल्क आकारण्यात आले. कोणतीही दुसरी स्वतंत्र पावती दिली नाही. याबाबत पावतीची विचारणा केली असता ती दिली नाही. सोबत लहान मुलगी असल्याने मी पैसे देऊन बाहेर पडलो. जास्त हुज्जत घातली नाही.
- सौमित्र गायकवाड, पर्यटक

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b22801 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top