पाणी, चिखलातून धोकादायक प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी, चिखलातून धोकादायक प्रवास
पाणी, चिखलातून धोकादायक प्रवास

पाणी, चिखलातून धोकादायक प्रवास

sakal_logo
By

मांजरी, ता. ८ : मांजरी बुद्रूक येथे नुकताच खुल्या झालेल्या रेल्वे भुयारी मार्गावर पाण्याचा निचरा होत नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साठून राहत आहेत. यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या पादचारी आणि प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

मांजरी बुद्रूक येथे आठवड्याभरापूर्वी रेल्वेने उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग सुरू केला. सुरुवातीला हा मार्ग केवळ पादचाऱ्यांच्या सोयीसाठी होता. मात्र, स्थानिक प्रवाशांच्या मागणीनंतर हा मार्गा रेल्वेने दुचाकींसाठीही खुला केला. मात्र, पहिल्याच दिवशी या मार्गावर पावसाचे पाणी आणि माती वाहून आल्याने हा मार्गाचा वापर करणे पादचाऱ्यांसाठीच काय तर दुचाकी वाहतुकदारांसाठीही जिकरीचे झाले. दुचाकींनाही मोठी कसरत करत यातून प्रवास करावा लागत आहे.

रेल्वेने भुयारी मार्गाचे काम केले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र, हा भुयारी मार्ग आपल्या खात्याकडील नाही, अशी समजूत करून तेथून होणाऱ्या वाहतुकीकडे दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उड्डाणपुलाच्या अपुऱ्या कामामुळे पुलाच्या जोडामधून पावसाचे पाणी भुयारी मार्गात येत आहे. सेवा रस्ते मातीचे असल्याने व भुयारी मार्गाच्या तोंडावर असलेल्या राडारोड्याची माती व गाळाचे पाणीही या मार्गात शिरते. सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाचे जोड झाकून टाकणे, सेवा रस्ते डांबरीकरण करणे, भुयारी मार्गाच्या तोंडावर चर काढून देणे अशी कामे तातडीने करणे आवश्यक असल्याचे संतोष घुले, बाबासाहेब शिंगोटे, गणेश जगताप, पूनम गायकवाड यांनी सांगितले.

पाणी उपसूनही प्रश्न सुटेना
रेल्वे विभागाच्या कंत्राटदाराने शुक्रवारी पंपाद्वारे पाणी उपसण्याचे काम केले. बादलीनेही गाळ काढण्याचे काम केले. मात्र, एवढे करूनही अद्याप येथील प्रवास सुकर झालेला नाही.

तेथील अभियंता व ठेकेदाराला सांगून पावसाचे पाणी भुयारी मार्गात जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. सेवा रस्त्यांचे कामही सुरू आहे.
- नकुल रणसिंग, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

रेल्वेकडून भुयारी मार्गाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आलेले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र, पुढे वाहिन्या जोडण्याच्या कामासाठी काही दिवसांचा वेळ लागेल.
- राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, रेल्वे बांधकाम विभाग

मांजरी रस्ता : रेल्वे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साठले असून दुचाकीस्वारांना यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.