तुम्हाला भेटून दुप्पट ऊर्जा मिळाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्हाला भेटून दुप्पट ऊर्जा मिळाली...
तुम्हाला भेटून दुप्पट ऊर्जा मिळाली...

तुम्हाला भेटून दुप्पट ऊर्जा मिळाली...

sakal_logo
By

औंध, ता. ३ : ‘‘कलाकार म्हणून माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा प्रसंग असून तुम्हाला भेटून मी खूष झालो आहे. मला दुप्पट ऊर्जा मिळाली आहे. मी जेव्हा नैराश्यात असेल तेव्हा नक्की तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा उपयोग करील,’’ या शब्दांत मराठी सिनेअभिनेते सिध्दार्थ जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गणेशखिंड रस्ता, औंध येथील बालकल्याण संस्थेत दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे व बालकल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी दिग्दर्शक नितीन नंदन, अभिनेत्री नंदिता पाटकर, बालकलाकार आर्यन मेंघजी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, दिव्यांग कल्याण सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, बालकल्याणचे विश्वस्त डॉ.संजीव डोळे, अवधूत वाळिंबे, व्यवस्थापिका अपर्णा पानसे व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘आपल्यातील व्यंगावर मात करत यश मिळवणारी ही मुले गुणवत्तेचे भांडार असून एव्हरेस्ट सर करतील यात शंका नाही. यांना घडवणा-या शिक्षकांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे’, अशा शब्दांत अभिनेते जाधव यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही गौरव केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सरकारी पातळीवर दिव्यांगासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. बालकल्याण संस्थेचे विश्वस्त डॉ. संजीव डोळे यांनी संस्थेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘थेरपी सेंटर’विषयी माहिती दिली. विशेष शाळांमधील साडेतीनशे दिव्यांग बालकांनी समूह गान, समूह वादन,शारीरिक मनोरे, योगासन व सनई चौघड्या सारखे दुर्मिळ होत चाललेल्या वाद्याचे वादन केले. या कार्यक्रमामध्ये अंध मुलींची शाळा कोथरूड,अंध मुलांची शाळा कोरेगाव पार्क, सीआर रंगनाथन कर्णबधिर विद्यालय, कामायनी विद्यामंदिर गोखलेनगर, कामायनी विद्यामंदिर उद्योग केंद्र, बालकल्याण संस्थेतील व लार्क स्कूल येथील विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. मुकबधीरांसाठी सांकेतिक भाषेत श्रुती आठल्ये यांनी संवाद साधला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी ठकार यांनी केले तर प्रवीण कोरगंटीवार यांनी आभार मानले.

PNE22T08940