प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन उत्साहात साजरा
प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन उत्साहात साजरा

प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

कँटोन्मेंट, ता. २५ : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत ख्रिसमसचा सण साधेपणाने साजरा झाला, पण यंदा शहरात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी व चर्चमध्ये आनंद गीतांच्या (कॅरल गीते) सादरीकरणासह दिवसभर विविध कार्यक्रमही घेण्यात आले.

शहरातील कॅम्प, एमजी रोड, सोलापूर रस्ता, घोरपडी, वानवडी, गुरुवार पेठ, विश्रांतवाडी तसेच पेठांच्या भागात सर्व बांधव एकमेकांना शुभेच्छा देत मेजवानीकरिता आमंत्रण देत होते. इमॅन्युअल चर्च, संत मदर तेरेसा चर्च, ब्रदर देशपांडे चर्च, सेंट झेवियर चर्च, सेंट पॅट्रिक्स, सेंट मॅथ्यू, सेंट अँथनी, हिंदुस्थानी मेथडिस्ट आदी चर्चमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सायंकाळी उपासना, तर ख्रिसमसच्या दिवशी सकाळी भक्ती करण्यात आली. यासाठी ख्रिस्ती बांधवांनी वेगवेगळ्या चर्चमध्ये गर्दी केली होती. चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अनेकांनी सांताक्लॉजची वेशभूषा परिधान करून चॉकलेटचे वाटप केले. ख्रिस्त बांधवांनी नाताळ सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

एमजी रोडवरील कयानी बेकरी, फर्नांडिस बेकरी, इम्पिरिअल बेकरीमध्ये सकाळपासून खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. गुरुवार पेठेतील पवित्र नाम देवालयातील चर्चमध्ये रेव्ह. अशोक कॅरप, रेव्ह. जे. एम. गायकवाड, रेव्ह. शशिकांत वाघमारे यांनी प्रार्थनासभा घेतली. सध्या देशातील अनेक भागात कोरोनाचे चाहूल असल्याने सोशल डिस्टन्सचे पालन करून सण साजरा केला जात असल्याचे चर्चचे सचिव मनोज येवलेकर यांनी सांगितले.

कॅम्प भागातील सेंट अँथनी चर्च सकाळपासून रात्रीपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. सेंट झेवियर चर्च येथे जन्मोत्सवाचा देखावा सादर केला होता. अनेक जणांनी फोटो व सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्याचबरोबर येथील डेकोरेटिव्ह गिफ्ट बॉक्स हे मोठे आकर्षण ठरले. आकाशकंदील, विद्युत रोषणाई अन् फुलांच्या सजावट, विविध तरुणाईच्या सहभागामुळे चर्चला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते.