लग्नसराई फक्त दोन महिन्यांचीच !

लग्नसराई फक्त दोन महिन्यांचीच !

कात्रज, ता. ६ : मराठी नववर्ष गुढीपाडव्याला सुरु झाल्यानंतर यंदा पहिलाच लग्नमूहूर्त ३ मे रोजी निघाला आणि लग्नसराईला सुरवात झाली. त्यानंतर लग्नासाठी यंदा २८ जूनचा शेवटचा मुहूर्त आहे. त्यामुळे यंदा लग्नसराई दोन महिन्यांची असेल आणि त्यात लग्नासाठी १७ मुहूर्त आहेत.
लग्नासाठी यंदा २८ जूननंतर मुहूर्त नाहीत. त्यानंतर आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरवात होते, तो कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. त्या चार महिन्यांच्या कालावधीत शक्यतो लग्न होत नाहीत. त्यानंतर थेट २५ नोव्हेंबरला विवाहमुहूर्त आहे. त्यामुळे यंदा २८ जूनपर्यंतचा मुहूर्त हुकल्यास लग्नासाठी संबंधितांना २५ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर २०२३ या वर्षातील ३१ डिसेंबर हा शेवटचा मुहूर्त असणार आहे. त्यामुळे यंदा मे आणि जून महिन्यातच लगीनघाई दिसून येईल.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लग्नासाठी जास्त संख्येने शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त संख्येने वधू-वर विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मे आणि जून महिन्यात लग्नासाठी तारखा असून दोन्ही महिन्यात लग्नाचे १७ मुहूर्त आहेत. यंदाच्या लग्नसराईचे वैशिष्ट्य म्हणजे मुहूर्त जास्त असल्याने लग्न करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यायाने लग्न कार्यालये, बँक्वेट हॉल व्यस्त राहतील. तसेच, लग्नकार्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्याचे पाहायला मिळेल.

असे असतील लग्नमूहूर्त
मे २०२३ ः ३, ४, ७, ११, १२, २१, २२, २९
जून २०२३ ः १, ३, ७, ८, १२, १४, २३, २६, २८
नोव्हेंबर २०२३ ः २५, २९
डिसेंबर २०२३ ः ६, ७, ८, ९, १४, १५, २१, २२, २५, ३१

गुरू आणि शुक्र हे दोन ग्रह जेव्हा अस्तंगत असतात, त्यावेळी व चातुर्मासात विवाहाचे मुहूर्त नसतात. गुरू ग्रहाचा अस्त ३१ मार्च २०२३ ते २९ एप्रिल २०२३ या काळात होता. त्यामुळे चैत्र महिन्यात मुहूर्त निघाले नाहीत; अन्यथा आणखी मुहूर्ताच्या तारखांमध्ये वाढ झाली असती. किमान शुक्र ग्रहाचा अस्त चातुर्मासात आल्यामुळे लग्नांच्या तारखांसाठी दिलासा मिळणार आहे.
- गौरव देशपांडे, देशपांडे पंचागकर्ते

अनेकवेळा मुहूर्त नसल्यावर वधू-वराच्या पत्रिकांचा अभ्यास करून चांगली तिथी काढून मुहूर्त काढण्यात येतात. त्यानुसार लग्नकार्य करतात. परंतु, आपल्याकडे मूहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने लग्न मुहूर्तावर करण्याचा वधू-वरांच्या नातेवाइकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार मूहूर्ताला महत्त्व आहे.
- अवधूत इगवे, गुरुजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com