
कबुतरांच्या स्पर्धेला खेळाची ओळख देण्याचा प्रयत्न : दारूवाला
कॅन्टोन्मेंट, ता. २२ : कबुतर पाळणाऱ्या पीजन मित्र असोसिएशन संस्थेच्या पुणे शाखेतर्फे कबुतरांची उडण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवनियुक्त सल्लागार अली दारूवाला यांनी व्यक्त केले.
पुणे पीजन मित्र असोसिएशनतर्फे कबुतर स्पर्धेचे वार्षिक पारितोषिक वितरण नुकतेच झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष (चेन्नई) व्ही. सत्या हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेन्नई येथील आयकर विभागाचे अरुण कुमार, भाजपचे पुणे संघटन सरचिटणीस गणेश घोष, संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, उपाध्यक्ष शशिकांत बालवडकर, सचिव सलीम शेख उपस्थित होते.
सत्या म्हणाले, ‘‘देशभरात या स्पर्धेबाबत कुतूहल आहे. केरळ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्रात अशा स्पर्धा होतात. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून यासंबंधीच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात काही अडचणी आहेत, त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’
अरुण कुमार म्हणाले, ‘‘२०१० मध्ये हा कबुतर शो सुरू केला. तीन वर्षे यश मिळाले नाही. पण मी हार मानली नाही. ही पूर्ण कायदेशीर स्पर्धा आहे.’’
शैलेंद्र जाधव म्हणाले, ‘‘आम्ही १५० ते १००० किमीच्या स्पर्धा घेतो. पक्षी ठरलेल्या वेळेत जाऊन घरी परत येतात. स्पर्धेचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. त्यात दर आठवड्याला एका गटातील स्पर्धा होते. पक्ष्यांच्या पायात विशिष्ट टॅग असतो. टॅग काढला की त्याद्वारे पक्षाने किती अंतर कापले हे कळते.’’
दरम्यान, २७५ किमीच्या पुणे-जालना या अंतराच्या कबूतर उडणे स्पर्धेत मुस्तफा पटेल यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. तर शैलेंद्र जाधव, सुनील अलकुंटे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक जिंकले.