आश्वासनाचे नव्याचे नऊ महिने! पुलाच्या उदघाटन ; सूस-पाषाण रस्त्यावरील सेवारस्ता झाला धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आश्वासनाचे नव्याचे नऊ महिने!

पुलाच्या उदघाटन ; सूस-पाषाण रस्त्यावरील सेवारस्ता झाला धोकादायक
आश्वासनाचे नव्याचे नऊ महिने! पुलाच्या उदघाटन ; सूस-पाषाण रस्त्यावरील सेवारस्ता झाला धोकादायक

आश्वासनाचे नव्याचे नऊ महिने! पुलाच्या उदघाटन ; सूस-पाषाण रस्त्यावरील सेवारस्ता झाला धोकादायक

sakal_logo
By

औंध, ता. ३१ ः सूस-पाषाण रस्त्यावरील नवीन उड्डाण पुलास समांतर असलेला सेवारस्ता खडी-वाळूमुळे प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. पुलाचे उदघाटन होऊन नऊ महिने झाले तरी, सेवारस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. या बाबत महापालिकेतील पथ आणि प्रकल्प विभाग परस्परांकडे बोट दाखवत आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गेल्यावर्षी १६ सप्टेंबर या पुलाचे उद्‍घाटन झाले होते. सेवारस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुलाचे उदघाटन करू नये, अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली होती. परंतु, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पूल खुला करणे गरजेचे असून दोन महिन्यांत सेवारस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून दिल्यानंतर रहिवाशांनी उद्‍घाटनास संमती दिली होती. परंतु, नऊ महिन्यानंतरही सेवारस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेषतः सूसकडून महामार्गाकडे येताना सेवारस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे तातडीने हे काम होणे आवश्यक होते. आधीच अरुंद सेवारस्ता आणि त्यात खड्डे. यामुळे वाहन चालवणे अडचणीचे ठरत आहे. रखडलेल्या रस्त्यावर संबंधित जागा मालकाने परवानगी न दिल्याने हा रस्ता रखडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे काम पूर्ण करून पुलाचे उद्‍घाटन करणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. पुलाचे उद्‍घाटन होऊनही सेवारस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
- विनय देशपांडे, रहिवासी, सूस रस्ता.

सेवारस्त्याचे काम न झाल्याने पावसाळ्यात खड्डे पडून अजून रस्ता खराब होणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढणार आहे. तसेच चेंबरचीही दुरुस्ती व्हावी, अशी मागणी आहे.
- हरेश पाटील, सचिव, बाणेर सूसरोड विकास मंच.

या सेवारस्त्याचे काम करण्यासाठी जागा मालक परवानगी देत नसल्याने हा रस्ता रखडला आहे. त्यामुळे येथे काम करण्यास अडचण येत आहे. हा विषय प्रकल्प विभागाच्या अखत्यारीत असून उड्डाण पुलाच्या कामासोबतच्या निविदेचाच हा भाग आहे.
- धनंजय खोले, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, महापालिका.