
घोरपडीमध्ये लव जिहाद विरोधात मोर्चा
घोरपडी, ता. ४ : बी. टी. कवडे रस्ता येथे लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार नीतेश राणे यांनी केले. याप्रसंगी हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, स्वाती मारणे, उज्ज्वला पवार, नीलेश मंत्री आदी उपस्थित होते.
या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नीतेश राणे म्हणाले, ‘‘पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करणार असून लव जिहाद प्रकरणात जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार आहे.’’ या वेळी घोरपडीत घडलेल्या एका प्रकरणातील पिडीतेचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले होते. त्या पीडितेने झालेल्या अत्याचाराची माहिती या वेळी देण्यात आली.
बी. टी. कवडे रस्ता ते घोरपडी गावातील जयहिंद चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या वेळी जागो हिंदू जागो, लव जिहाद कायदा झालाच पाहिजे, हर नारी की यही पुकार, साक्षी के हत्यारों का करो संहार अशा प्रकारचे विविध संदेश देणारे फलक हातामध्ये घेऊन शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.