
जीतो कनेक्ट परिषद: साडेचार लाखांहून अधिक उपस्थिती स्टार्टमध्ये ३८ कोटींची गुंतवणूक
पुणे, ता. ९ : ‘‘जीतो कनेक्ट : २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत आलेल्या विविध स्टार्टमध्ये ३८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच १८८ फ्रँचाईजीचे वाटपही या वेळी झाले. तीन दिवसांच्या या परिषदेला साडेचार लाखांहून अधिक उद्योजक, व्यापारी व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. ही या परिषदेची उपलब्धी आहे,’’ अशी माहिती ‘जीतो अपेक्स’चे व्हाईस चेअरमन विजय भंडारी यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘जीतो पुणे चॅप्टर’च्यावतीने गंगाधम-कात्रज-कोंढवा रस्त्यावर वर्धमान लॉन्ससमोर या परिषदेचे आयोजन केले होते. ज्वेलरी, फॅशन, स्टार्टअप, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था, रियल इस्टेट, इलेक्ट्रॉनिकसह इतर अनेक क्षेत्रांतील उत्पादन व सेवांचा ‘ट्रेड फेअर’ ही परिषदेची वैशिष्टे ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, कवी कुमार विश्वास, प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास व विवेक बिंद्रासह ९५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत वक्त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
कोरोनाच्या महाभयंकर कालखंडानंतर उद्योग व्यवसायाला चेतना व ऊर्जा देण्यासाठी ‘जीतो कनेक्ट’ सारख्या उपक्रमाची आवश्यकता होती. ‘जीतो पुणे चॅप्टर’ने कमी कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करून दाखवले. त्यासाठी ‘जीतो अॅपेक्स’चे चेअरमन गणपतराज चौधरी, अध्यक्ष सुरेश मुथा, ‘जीतो पुणे’चे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, ‘जीतो कनेक्ट’चे मुख्य प्रायोजक विनोद मांडोत, समन्वयक राजेश सांकला, मुख्य सचिव पंकज कर्नावट, सचिव चेतन भंडारी, धीरज छाजेड, इंदर छाजेड, रमेश गांधी, इंदर जैन, कांतिलाल ओसवाल, अजय मेहता, उद्योजक नरेंद्र बलदोटा, माणिकचंद ग्रुपचे प्रकाश धारिवाल आदींचे सहकार्य लाभल्याचे भंडारी यांनी सांगितले.
तीन दिवसांच्या या परिषदेत उद्योग व व्यापार क्षेत्रातील आव्हाने, संधी आणि आजारी उद्योगावरील उपाय यासंबंधी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याबरोबरच स्थानिकांसह देश व विदेशातील व्यापार-उद्योगांच्या संधीबद्दल याठिकाणी झालेल्या चर्चासत्र व परिसंवादातून माहिती मिळाली. जैन पॅव्हेलियनच्या माध्यमातून जैन धर्माविषयीची माहिती देण्यात आली होती. या पॅव्हेलियनला लाखो नागरिकांनी भेट दिली.
-विजय भंडारी, व्हाईस चेअरमन, जीतो अपेक्स
Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01814 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..