
साबुदाणा, भगरीच्या दरात वाढ
पुणे, ता. २९ : श्रावण महिन्यात उपवासांची रेलचेल असल्याने उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांना मागणी वाढली आहे. उत्पादन कमी आणि कच्च्या मालाच्या भावात वाढ झाल्यामुळे साबुदाण्याच्या दरात ७०० रुपये, भगरीच्या दरात २०० रुपये आणि राजगिराच्या दरात ४०० रुपयांनी प्रत्येकी क्विंटलमागे वाढ झाली आहे.
श्रावण, भाद्रपद, गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर उपवासाचे महिने असल्याने बाजारात उपवासासाठी लागणाऱ्या मालाची मोठी आवक असते. परंतु, यंदा आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर वाढले असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी आशिष दुगड यांनी सांगितले.
गुळ-भुसार बाजारात दररोज ५० ते ६० टन भगर, १०० ते १२० टन साबुदाणा, १५-२० टन राजगिरा बाजारात दाखल होत आहे. खिचडी, दशमी, पुरी, भाजणी, थालीपीठ आदींसह विविध पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालालाही मागणी चांगली आहे. परिणामी, भगर व साबुदाण्याच्या भावात तेजी आली आहे. उत्पादन कमी असल्याने साबुदाणा उत्पादकांनीच दरवाढीचा निर्णय घेतल्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.
का झाली दरवाढ
- पेरण्या कमी त्यामुळे कच्चा माल कमी
- कोरोनामुळे दोन वर्षे मालाची मागणी कमी
- आवक कमी, मागणी जास्त
येथून होते आवक
घाऊक बाजारात नाशिक जिल्ह्यातून भगरीची आवक होते. तर तमिळनाडू येथून साबुदाण्याची आवक होते. छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातून भगरीसाठी लागणारा कच्चामाल नाशिक येथील मिलमध्ये पाठविण्यात येतो. तेथून प्रक्रिया झालेली भगर मार्केट यार्डातील भुसार बाजारात दाखल होते. तर साबुदाण्याची तमिळनाडूमधील सेलम जिल्ह्यातून बाजारात आवक होते. तर राजगिराची आवक गुजरात येथून होते.
दर्जानुसार क्विंटलचे दर
भगर : १०८०० - ११६००
साबुदाणा : ६००० - ६७००
राजगिरा : १०५०० - १०८००
दर्जानुसार किलोचे दर
भगर : १३०-१४०
साबुदाणा : ८०-९०
राजगिरा : १२०-१३०
आधीच महागाई आहे. त्यात पुन्हा उपवासाच्या पदार्थांचे दर वाढल्याने उपवास करावा की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांचे दर कमी होणे गरजेचे आहे.
- रेश्मा मोरे, कात्रज, गृहिणी
जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने होणारी भाववाढ यामुळे घर खर्च भागवणे अवघड होत आहे. यावर सरकारने उपयोजना करणे गरजेचे आहे. ऐन सणांच्या महिन्यात उपवास महागला तर सर्वसामान्यांनी उपवास कसा करावा हा प्रश्न आहे.
- दीपाली गोते, हडपसर, गृहिणी
Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01919 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..