मिरचीमुळे महागाई आणखी तिखट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरचीमुळे महागाई आणखी तिखट
मिरचीमुळे महागाई आणखी तिखट

मिरचीमुळे महागाई आणखी तिखट

sakal_logo
By

प्रवीण डोके
पुणे, ता. १७ : मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे मिरचीच्या भावात वाढ होऊन क्विंटलमागे लाल मिरचीचे दर ४३ ते ५५ हजारांपर्यंत पोचले आहेत.
मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सध्या मिरचीची ६० ते ७० टक्के भाववाढ झाली आहे. ‘मागील वर्षी मिरचीला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. त्यामुळे, मिरचीच्या दरात घट झाली होती. परंतु झालेल्या अवकाळी पावसाने, वादळाने आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशातील मिरचीचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले आहे. नोव्हेंबरपासून हंगामास सुरुवात होते. तेव्हापासून या दर वाढीला सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात कर्नाटक, मध्यप्रदेशातून तर आंध्रप्रदेश तेलंगणातून डिसेंबरमध्ये मिरची बाजारात येते. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सध्या पुण्याच्या बाजारपेठेत लाल मिरचीचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकाची मागणी कमी झाल्याने आवकही घटली आहे. दर वाढीमुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे तुलनेने उत्पादकांकडे आवश्यक साठा उपलब्ध नाही. मालाचा तुटवडा आणि वाढती रोगराई तसेच मजुरांचा अभाव यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मिरचीचे दर तेजीत राहतील.
- वालचंद संचेती, मिरचीचे ज्येष्ठ व्यापारी

कर्नाटक, तेलंगण सरकारने आता मिरची उत्पादकांना मिरचीऐवजी कापसाचे उत्पादन घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मिरचीचे उत्पादन आणखी घटण्याची शक्यता आहे. लाल मिरचीचे रोगराईमुळे देखील गेल्या काही वर्षांत सातत्याने नुकसान होत आहे.
- राजेंद्र गुगळे, मिरचीचे व्यापारी

इथे घेतले जाते उत्पन्न
देशात आंध्रप्रदेशात सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक पाठोपाठ मध्यप्रदेशात उत्पादन घेण्यात येते. महाराष्ट्रात खानदेशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तेलंगणात तिखट तर कर्नाटकात कमी तिखटाच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्याशिवाय आसाम आणि पश्चिम बंगाल, पंजाब राज्यांमध्ये उत्पादन घेतले जाते.

का झाली दरवाढ?
- अवकाळी पावसाचा मोठा फटका
- ७० टक्क्यांपर्यंत मिरचीचे नुकसान
- उत्पादन क्षेत्रात निर्यातीसाठी मिरचीला मागणी अधिक
- शीतगृहात असलेला मिरचीचा साठा यंदाच्या वर्षी कमी
- कर्नाटकाबरोबर गंटूर येथे पाऊस जास्त असल्याने पीक उशिरा येणार
- नवीन मिरची बाजारात यायला चार महिने बाकी
- मालाचा तुटवडा होऊन आणखी दरवाढ होण्याची शक्यता

या देशात होते निर्यात
चीन, थायलंड, बांगलादेश, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेदरलॅंड, जपान, स्वीडन, कॅनडा, इराण, ऑस्ट्रेलिया, इटली

घाऊक बाजारातील मिरचीच्या दराची स्थिती
प्रकार ------ जानेवारी दर ------ ऑगस्टचे दर
ब्याडगी मिरची -- २०,००० ते २३,००० --३८,००० ते ४३०००
डब्बी मिरची -- ३५००० ते ३७००० -- ५१,००० ते ५५,०००
खुडवा मिरची -- ५,००० ते ५५०० -- ११,००० ते १२,०००
गंटूर मिरची -- १५,००० ते १५००० -- २५,००० ते २६,०००
तेजा मिरची -- २१,००० ते २२,००० -- २५,००० ते २६,०००

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01940 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..