Edible Oil :खाद्यतेलाच्या दरांमध्ये मोठी घसरण; पिशवीमागे २० ते ३० रु. घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Edible Oil
खाद्यतेलाच्या दरांमध्ये मोठी घसरण

Edible Oil :खाद्यतेलाच्या दरांमध्ये मोठी घसरण; पिशवीमागे २० ते ३० रु. घट

पुणे : खाद्यतेलांच्या १५ लिटर/किलोच्या डब्यामागे ३०० ते ६०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो/लिटर तेलाच्या पिशवीमागे २० ते ३० रुपयांनी घट झाली. त्यामुळे दसरा, दिवाळी सणात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मार्केटयार्डातील भुसार विभागात दररोज विविध प्रकारच्या खाद्यतेलाची सुमारे १०० टनाची आवक होते. महिनाभरापूर्वी विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला होता. त्यामुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारात खाद्यतेलाची खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत होता. मात्र आता दरात मोठी घट झाली असल्याचे तेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.

जोपर्यंत जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत राहिल, तोपर्यंत खाद्यतेलाच्या दरात वाढ होणार नाही. शहरातही खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेसह किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात खाद्यतेलाच्या दराने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जागतिक बाजारपेठेत भारत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. भारताला दरवर्षी साधारणतः १५० लाख टन खाद्यतेल लागते. भारताला वर्षाला २२५ लाख टन तेलाची गरज आहे. देशात दरवर्षी साधारणतः ८० लाख टन तेलनिर्मिती केली जाते.

का कमी झाले दर?
- देशात तेलबियांचे उत्पादन जास्त
- जागतिक बाजारपेठेतही तेलाचा पुरवठा जास्त
- आवकेच्या तुलनेत मागणी कमी
- परिणामी खाद्यतेलाच्या दरात सातत्याने घट
- इंडोनेशिया व मलेशियात पाम तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात
- जागतिक बाजारपेठेतून खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत
- शेंगदाणा तेलाचे दर मात्र टिकून

घाऊक बाजारातील खाद्यतेलाचे १५ लिटर/किलोचे दर
तेलाचा प्रकार -- पूर्वीचे दर -- आताचे दर
पाम -- १९०० ते २१०० -- १६०० -१६२०
सूर्यफूल -- २४०० ते २६०० -- २०५०-२२३०
सोयाबीन -- २०७० ते २२५० -- १८२०-२०८०
सरकी तेल -- २०५० ते २०८० -- १९००
वनस्पती -- २००० ते १९८० -- १४८०

सध्या जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे दरात मोठी घट झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर तेल बियांचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत आयातही कमी होईल. त्याचाच परिणाम म्हणून घाऊक आणि किरकोळ बाजारातील तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
- रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी, मार्केटयार्ड

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b02012 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..