
मार्केट यार्डात आला सफरचंदाचा निनावी ट्रक बाजार समितीने कारवाई करत मालाचा केला लिलाव
पुणे, ता. २५ : गुलटेकडी मार्केट यार्डात निनावी सफरचंदाच्या ट्रकची आवक मागील आठवड्यात झाली. डमी अडत्यांने हा ट्रक मागविल्याचे समोर येत आहे. प्रकरण अंगाशी येईल, यामुळे डमी अडत्य पुढे न आल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यापाऱ्याने दिली.
मागील आठवड्यात डमी अडत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते. यामध्ये डमी व्यापारी कोणत्याही हिशोब पट्टीशिवाय शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवसाय करत असल्याचे समोर आले होते. त्यातच पुन्हा अशाप्रकारे निनावी सफरचंदाचा ट्रक बाजारात आला आहे. त्यामुळे डमी अडते नेहमीच माल मागवतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजार समितीने अशा प्रकारे निनावी माल मागविण्याच्या घटना होत नसल्याचे म्हटले आहे. बाजार समिती प्रशासनाने यातील मालाचा एक लाख २७ हजार रुपयांना लिलाव केला. यातून बाजार समितीला खर्च वगळून एक लाख तीन हजार रुपयांचा फायदा झाला. सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे प्रवेशद्वारावर कार्यरत होते. त्यावेळी ‘एएफसी’ फर्मचे नाव सांगत हा ट्रक आला. मात्र, बाजारात या नावाची फर्मच नसल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी चालकाने एका अडत्याचे नाव सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्याला बोलावून घेतले. मात्र, त्याने हा ट्रक आपला नसल्याचे सांगितले. सिराज नावाच्या व्यक्तीचे नाव सांगितले. मात्र, अशी कोणती व्यक्ती असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ट्रकमधील दहा ते २० किलो वजनाचे १३७ सफरचंदाचे बॉक्स बाजार समितीने जप्त केले. तसेच याचा लिलाव केल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.