मार्केट यार्ड : मागील वर्षीपेक्षा जास्त उलाढाल दिवाळीच्या खरेदीने भुसार विभागाला बूस्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मार्केट यार्ड : मागील वर्षीपेक्षा जास्त उलाढाल
दिवाळीच्या खरेदीने भुसार विभागाला बूस्टर
मार्केट यार्ड : मागील वर्षीपेक्षा जास्त उलाढाल दिवाळीच्या खरेदीने भुसार विभागाला बूस्टर

मार्केट यार्ड : मागील वर्षीपेक्षा जास्त उलाढाल दिवाळीच्या खरेदीने भुसार विभागाला बूस्टर

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : मार्केट यार्डातील भुसार विभागात मागील वर्षीच्या तुलनेत १२२ कोटी रुपयांची अधिक उलाढाल झाली आहे. वाढलेली उलाढाल बाजार समितीबरोबरच व्यापाऱ्यांसाठी आर्थिक बूस्टर डोस देणारी ठरली आहे.

यंदा नागरिकांकडून उत्साहाने खरेदी झाल्यामुळे मार्केट यार्डातील भुसार विभागाची दिवाळी झाली आहे. मागील वर्षी २२८ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन यावर्षी ३५० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागीलवर्षी कोरोनाचे प्रमाण कमी होते. मात्र, अनेक घरांमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली नव्हती. यंदा मात्र शहरासह उपनगरांत दिवाळीचा उत्साह मोठा होता.

ऑनलाइनऐवजी स्थानिकांकडून खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली होती. परिणामी, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांतील ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मागणी जास्त असल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत आवकही जास्त झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ९७ हजार ८७३ क्विंटल मालाची जास्त आवक झाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कालावधी आवक (क्विंटलमध्ये) उलाढाल (कोटींमध्ये)
१५ ऑक्‍टोबर ते ५ नोव्हेंबर २०२१ ४,९४,७५९ २२८
१ ते २५ ऑक्‍टोबर २०२२ ५,९२,६३२ ३५०

मागील दोन, तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ग्राहकांनी खरेदीसाठी जास्त गर्दी केली होती. त्यामुळे मालाची विक्री अधिक झाली. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १२२ कोटी रुपयांनी उलाढाल जास्त झाली. कोरोनानंतर पहिल्यांदाच नागरिकांनी उत्साहाने दिवाळी साजरी केली. त्याचा परिणाम मार्केट यार्डातील भुसार बाजारात दिसून आला.
- प्रशांत गोते, विभागप्रमुख, भुसार बाजार

फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या आटा, रवा, मैदा, बेसन, पोहे, विविध मसाले, तेल, तूप, साखरेला जास्त मागणी होती. तसेच, नेहमीच्या तुलनेत स्वस्त असल्याने मिठाईऐवजी गिफ्ट म्हणून देण्यासाठी ड्रायफ्रुटला पसंती मिळाली. परिणामी, ड्रायफ्रुट खरेदीही अधिक झाली. नागरिकांच्या उत्साहामुळे यंदा दिवाळीत व्यापार-उद्योगाला चालना मिळाली.
- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‌स चेंबर