गाळ्यासमोरील जागेला १० हजार भाडे

गाळ्यासमोरील जागेला १० हजार भाडे

मार्केट यार्ड, ता. २१ : कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळ्यासमोरील १० फुटांच्या जागेसाठी ‘जागा वापर आकार’ म्हणून महिन्याला १० हजार रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव ग्रामीण उपनिबंधक कार्यालयाला दिला आहे. या प्रस्तावाला मार्केट यार्डातील आडते असोसिएशनने विरोध करत बाजार बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासन आणि आडते संघटनांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.

बहुतांश आडते आपल्या गाळ्यावर आणि गाळ्यासमोरील १५ फुटांच्या जागेवर त्यांचे व्यापारी प्रतिनिधी म्हणून काही बेकायदा माणसे व विक्रेते (डमी) ठेवत असून, त्यांच्याकडून जागा वापराबाबत मासिक भाडे रक्कम घेत आहेत. बेकायदा ठेवलेल्या माणसांचा व्यवहार पारदर्शक नसल्याने, बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत त्यांच्याकडून मासिक १० हजार रुपये आणि त्यावर जीएसटी, जागा वापर आकार आणि सेवासुविधा शुल्क आकारणी करणे, तसेच आकारणीमध्ये प्रत्येकवर्षी एक हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव बाजार समितीने उपनिबंधक कार्यालयाला दिला होता. या प्रस्तावाला आडते असोसिएशन आणि बाजारातील बहुतांशी आडत्यांनी विरोध केला आहे.
या प्रस्तावाबाबत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात आडते असोसिएशन आणि बाजार समिती प्रशासनात बैठक झाली. यामध्ये चर्चेअंती कोणताही निर्णय होऊ शकला नाही. या प्रस्तावाला विरोध असल्याचे पत्र बाजार समितीला दिल्याचे आडते असोसिएशनने सांगितले.


सर्व आडते शेतमालाचा व्यवसाय करत आहेत. त्यासाठी बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवरच सर्व आडते व्यवसाय करत आहेत. शेतमाला व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त व्यवसाय करत नाही. या प्रस्तावास सर्व आडतदारांचा एकमताने विरोध आहे. हा प्रस्ताव लादला गेल्यास असोसिएशनच्या वतीने बाजार आवार बेमुदत बंद ठेवण्यात येईल.
- अनिरुद्ध भोसले,
अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन, पुणे

वर्षाकाठी सेस स्वरूपात कोट्यवधीची रक्कम भरतो. मागील १० वर्षांत बाजार समितीत १८५ कोटी रुपये सेस स्वरूपात भरले आहेत. असे असताना बाजार समिती आमच्याकडून अतिरिक्त जागेचा वापर आकार वसूल करण्याच्या तयारीत आहे. या सर्व गोष्टींना सर्व आडत्यांचा विरोध आहे. याबाबत वसुली सुरू झाल्यास बाजार बेमुदत बंद ठेवण्यात येईल.
- विलास भुजबळ,
माजी अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन, पुणे


गाळ्यासमोरील जागेला प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये भरले पाहिजे, असा प्रस्ताव पणन संचालकांना दिला आहे. आडत्यांचा विरोध बघता या रकमेत काही रक्कम कमी करून पुन्हा प्रस्ताव पाठवण्याचे विचाराधीन आहे. आडत्यांना खुल्या जागेचे भाडे ‘जागा वापर आकार’ म्हणून द्यावेच लागेल. आडत्यांना काही ना काही भाडे द्यावेच लागेल, याबाबत बाजार समिती भूमिकेशी ठाम आहे.
- मधुकांत गरड,
प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com