नोटबंदीचा मार्केट यार्डात परिणाम नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोटबंदीचा मार्केट यार्डात परिणाम नाही
नोटबंदीचा मार्केट यार्डात परिणाम नाही

नोटबंदीचा मार्केट यार्डात परिणाम नाही

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. २० : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जाऊन बदलून घेण्याचे आदेश दिले आहेत. देशात चलनी नोटांमध्ये दोन हजार रुपयांची नोट ही सर्वाधिक मूल्य असलेली नोट आहे. मात्र, सध्या मार्केट यार्डात दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा फारशा दिसत नाहीत. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर बाजारात त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही.

मार्केट यार्डातील होलसेल आणि किरकोळ दुकानात दोन हजारांच्या नोटा आल्याच नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दोन हजारांच्या नोटा बाजारातून सहा महिने आधीपासून कमी झालेल्या आहेत. दिवसभरात चार ते पाच ग्राहक वगळता कोणीही नोटा घेऊन येत नाही. मार्केट यार्डातील धान्य, किराणा आणि सुकामेवा बाजारात सध्या तरी दोन हजारांच्या नोटबंदीच्या निर्णयाचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आलेला नाही, परंतु पुढील काही दिवसात याचा परिणाम होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना वर्तविला.

दोन हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने बंद केले असल्या तरी सध्या बाजारात खूपच कमी नोटा आहेत. त्यामुळे मागील नोटबंदीची परिस्थिती वेगळी होती. सध्या ग्राहक खरेदीसाठी येत आहेत, परंतु तुरळक प्रमाणात दोन हजारांच्या नोटा येत आहेत. मात्र, संपूर्ण बाजारात सध्या अस्थिर परिस्थिती असून त्यात दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय अयोग्य आहे.
- अभय संचेती, व्यापारी, मार्केट यार्ड

दुकानात ग्राहक येत आहेत, परंतु मागील सहा महिन्यांपासून दोन हजारांच्या नोटा येणे हळूहळू बंद झाले आहे. दिवसभरात १५०-२०० ग्राहकांमधून ५-६ ग्राहक दोन हजारांच्या नोटा घेऊन येतात. नोटबंदीमुळे दोन हजारांच्या नोटा वाढतील, असे वाटले होते, परंतु तसे काहीही झालेले नाही. पुढील काही दिवसांत दोन हजारांच्या नोटा बाजारात जास्त येण्याची शक्यता आहे.
- जसराज चौधरी, बालाजी ट्रेडर्स, मार्केट यार्ड

सध्या ग्राहक नियमित आहे. नवीन ग्राहक किंवा दोन हजारांच्या नोटा घेऊन येणारा ग्राहक आजच्या परिस्थितीत तरी वाढलेला नाही. त्यामुळे बाजारावर अजून तरी कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.
- विनोद गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड