धनगर आरक्षणावरून 
लक्ष वळविण्यासाठी नामांतर : अजित पवार

धनगर आरक्षणावरून लक्ष वळविण्यासाठी नामांतर : अजित पवार

पुणे, ता. २ : स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हटविले होते. यावरून सुरू झालेली टीका, निदर्शने, आंदोलने तसेच धनगर आरक्षणावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात आल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या २५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकरांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘‘यापूर्वी सत्तेत असताना सरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. तो पूर्णत्वास न गेल्याने सरकारने नामांतराचा मुद्दा पुढे आणला आहे. तसेच, लोकांचे मन वळविण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. नगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळाले, यांचे स्वागत आहे. महापुरुषांच्या नावे शहर ओळखले जावे, यात कोणतेही दुमत नाही. महापुरुषांचे स्मरण तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र, ते करत असताना राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवू नये.’’

जे. जे. रुग्णालयप्रश्नी तोडगा काढा
मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाच्या डिन, प्रमुख डॉक्टरांसह काहींनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला असून, तेथील डॉक्टर सामूहिक संपावर गेले आहेत. परिणामी रुग्णांचे हाल सुरू आहेत. रुग्णालयाच्या विविध अडचणी असतात, त्यावरून या घटना घडतात. अशावेळी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे; पण यात राज्य सरकार कमी पडत आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com