हजारो किलो मटण, चिकन, मासळी फस्त 
कोठे रंगल्या आखाड पार्ट्या तर कोठे कुटुंबीयांकडून मांसाहाराला प्राधान्य

हजारो किलो मटण, चिकन, मासळी फस्त कोठे रंगल्या आखाड पार्ट्या तर कोठे कुटुंबीयांकडून मांसाहाराला प्राधान्य

Published on

मार्केट यार्ड, ता. २० : श्रावण महिना येत्या शुक्रवारी सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी रविवारच्या सुटीची पर्वणी साधत आखाड पार्टीचे आयोजन केले तर कोणी घरीच मांसाहारी खाण्याचे बेत आखले.
आषाढातील शेवटचा रविवार हजारो किलो मटण, चिकन, मासळीवर ताव मारत पुणेकरांनी साजरा केला. त्यामुळे मटण, चिकन आणि मासळीच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. पुणे व पिंपरी चिंचवड शहर परिसरात सुमारे २० ते २५ हजार किलो मटण, २५ ते ३५ टन मासळी तर ७०० ते ८०० टन जिवंत ब्रॉयलर कोंबड्यांची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मटण, चिकन आणि मासळीच्या बाजारात दिवसभर मोठी गर्दी होती. एरवी सकाळी आठनंतर गजबजणाऱ्या मटणाच्या बाजारपेठेत रविवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होती. काही दुकाने सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होती. खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्या होता. रविवारमुळे होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन व्यापाऱ्यांनीदेखील तयारी केली होती. शहर आणि उपनगरातील प्रसिद्ध असलेल्या हॉटेलांतदेखील खवय्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
गणेश पेठेतील मासळीच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. मासळी बाजारात खोल समुद्रातील १२ ते १५ टन, खाडीची ३०० ते ४०० किलो, नदीची ४ ते ५ टन आवक झाली. तर, आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे २० ते २५ टन इतकी आवक झाली होती.
पुणे डिस्ट्रीक्ट ब्रॉयलर ट्रेडर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी म्हणाले, ‘‘चिकनसाठी नागरिकांची सकाळपासून गर्दी केली होती. रविवारी गर्दी होणार हे लक्षात घेत विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात जिवंत कोंबड्यांची खरेदी करून ठेवली होती. चिकनच्या एका किलोला २०० रुपये भाव होता.’’
--------
मासळीसाठी बाजारात गर्दी
सध्या मर्यादित मासेमारीमुळे मासळीची आवक साधरण होत आहे. आषाढामुळे गेला आठवडाभर मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रविवारी नागरिकांनी मासळी खरेदीसाठी गर्दी केली होती. मासळी बाजारात चालायला जागा नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
--------

‘‘आषाढाचा आजचा शेवटचा रविवार असल्याने नागरिकांनी मटण खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बोकड आणि बोलाईच्या मटणाला, खिम्याला मागणी होती. एक किलो मटणाचा दर ७८० रुपये होता.
- प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, पुणे शहर मटण असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com