अडते असोसिएशनच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त
वार्षिक सर्वसाधरण सभा सभासदांच्या आरोप–प्रत्यारोपांनी गाजली

अडते असोसिएशनच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त वार्षिक सर्वसाधरण सभा सभासदांच्या आरोप–प्रत्यारोपांनी गाजली

Published on

मार्केट यार्ड, ता. १ : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अखेर त्रैवार्षिक निवडणुकीला मुहूर्त मिळाला. दोन सभासदांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केल्याने विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध (बापू) भोसले यांनी निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निवडणूक वादावर अखेर पडदा पडला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून वार्षिक सभा न घेण्यात आल्याने असंतोष निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी झालेल्या सभेत विविध विषयांवरून आरोप–प्रत्यारोपांची मालिका रंगली. निवडणूक पद्धत, दफ्तर तपासणी, कोर्ट केसेस, शेड उभारणीतील भ्रष्टाचार तसेच अडत्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष अशा मुद्द्यांवरून सभागृह तापले.
अडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध (बापू) भोसले, उपाध्यक्ष सौरभ कुंजीर, सचिव करण जाधव, पदाधिकारी महेश शिर्के, रोहन जाधव आदी उपस्थित होते. अडतदार किशोर कुंजीर यांनी ‘अनेक वेळा प्रयत्न करूनही आमचे प्रश्न सुटलेले नाहीत. असोसिएशनला दिलेली पत्रे स्वीकारली जात नाहीत’, अशी तक्रार सभेत केली. त्यांचा अर्ज अखेर स्वीकारण्यात आला. माजी अध्यक्ष अमोल घुले यांनी पद नसतानाही अडत्यांसाठी केलेल्या कामांचा उल्लेख करत अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली. उपाध्यक्ष सौरभ कुंजीर यांनीही अध्यक्षपदासाठी उमेदवारीची तयारी दाखवली. त्यामुळे सभेच्या शेवटी अध्यक्ष भोसले यांनी निवडणूक जाहीर केली.
अडते असोसिएशनची निवडणूक घेतली जाणार, असे सर्वसाधारण सभेत जाहीर केले आहे. तरीही मतदार याद्या आणि उर्वरित सर्व प्रक्रिया होण्यासाठी पुढील किती महिने लागणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे अडते असोसिएशनची निवडणूक महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरच होणार असल्याची चर्चा आहे.
--------
‘सेस भरा, गैरसमज टाळा’
बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांनी बाजारातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘काहीही करा पण सेस वेळेवर भरा. संचालक मंडळात आम्हाला कमीपणा वाटायला नको. निवडणुकीमुळे एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होतात, म्हणून संपूर्ण कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध व्हावी.’’ त्यांच्या मताला अडतदार नितीन कुंजीर, नितीन जामगे, दादा लाटे आदींनीही समर्थन देत एकमताने निवडणूक बिनविरोध पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------

‘‘निवडणूक बिनविरोध होण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अध्यक्षपदासाठी दोघे इच्छुक असल्याने आता लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
- बापू भोसले, अध्यक्ष, अडते असोसिएशन, मार्केट यार्ड
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com