"युती'साठी आज बैठक? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पुणे - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती करण्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष शुक्रवारी (ता. 20) भेटण्याची शक्‍यता आहे. युती करण्यासाठी कोणते निकष निश्‍चित करावेत, यासंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा होईल. 

पुणे - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती करण्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष शुक्रवारी (ता. 20) भेटण्याची शक्‍यता आहे. युती करण्यासाठी कोणते निकष निश्‍चित करावेत, यासंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा होईल. 

दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची सोमवारी बैठक झाली होती. यात दोन्ही पक्षांनी आपापले निकष ठरवून 20 जानेवारीला शहराध्यक्षांनी परस्परांशी चर्चा करावी. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांची पुन्हा बैठक घेऊन जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा, असे ठरले होते. त्यानुसार भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांची बैठक उद्या होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यासाठी पुण्यातील नेते गेले होते. 

निम्हण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""युतीसंदर्भात दोन्ही शहराध्यक्षांनी 20 जानेवारीला चर्चा करण्याचे ठरले होते. त्यानुसार उद्या किंवा लवकरच बैठक होईल.'' 

दरम्यान, दोन्ही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी युतीला विरोध केला आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास जास्त जागा मिळू शकतील, असे त्यांना वाटते. युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, अशी सूचना दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केली असली, तरी अंतिम निर्णय प्रदेश पातळीवरच होईल, असे दोन्ही पक्षांतील सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Today's meeting of the BJP-SS