स्वच्छ भारत अभियानात शौचालये कागदोपत्री! 

दिलीप कुऱ्हाडे 
गुरुवार, 28 जून 2018

येरवडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येरवड्यात बांधलेली सुमारे एक हजार वैयक्तिक शौचालये केवळ कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

येरवडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येरवड्यात बांधलेली सुमारे एक हजार वैयक्तिक शौचालये केवळ कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

येरवडा परिसरात वाल्मीकी- आंबेडकर घरकुल योजना व शहरी गरिबांसाठी घरकुल योजना (बीएसयूपी) योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुले बांधली आहेत. यात शौचालय बांधणे सक्तीचे होते. त्यामुळे लक्ष्मीनगर, अशोकनगर, यशवंतनगर, सिद्धार्थनगर, मदर तेरेसानगर, शनिआळी, वडारवस्ती, कंजार भाटनगर, नेताजीनगर, सुभाषनगर, बालाजीनगर आदी परिसरात शेकडो घरकुले बांधली आहेत. या घरांमध्ये वैयक्तिक शौचालये असताना अधिकाऱ्यांनी नगरसेवक, कंत्राटदार यांच्या संगनमताने नव्याने शौचालये बांधल्याचे कागदोपत्री दाखवून, कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. 

येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील सहायक महापालिका आयुक्तांनी प्रभागातील कनिष्ठ अभियंत्यांकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालये बांधण्याचे नुकतेच उद्दिष्ट पूर्ण करून घेतले आहे. यात प्रत्येक ठेकेदाराला शौचालय नसलेल्या घरांचे सर्वेक्षण करून, शौचालय बांधण्याची परवानगी दिली. प्रत्येक शौचालयासाठी अठरा हजार रुपयांचे अनुदान असल्याचे सांगितले. प्रत्येक ठेकेदाराने वीस ते तीस शौचालये बांधून शंभर ते दोनशे शौचालये बांधल्याचे कागदोपत्री दाखवून अठरा ते छत्तीस लाख रुपयांचे बिल घेतले आहे. बिल मंजुरीसाठी ठेकेदारांच्या फाइलवर कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालयातील सहायक महापालिका आयुक्त, घन कचरा व्यवस्थापन कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. 

लाभार्थ्यांचे शौचालय बांधताना रेखांश व अक्षांश घेतले आहे, त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्‍यता नाही. किती शौचालये बांधली गेली याची नेमकी संख्या सांगता येत नाही. 
- विजय लांडगे, सहायक महापालिका आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय 

येरवड्यात अनेक घरे सरकारी योजनेंतर्गत बांधली आहेत. पक्‍क्‍या घरांमध्ये अनेकांनी स्वखर्चाने शौचालये बांधली आहेत. त्यामुळे नवीन शौचालयाचे अनुदान घेतलेल्या सुमारे तीन हजार लाभार्थ्यांची नावे प्रसिद्ध करावीत. 
- रोहित वाघमारे, लक्ष्मीनगर 

Web Title: Toilets document in Swachh Bharat Abhiyan