कांदा नव्हे टोमॅटो आणणार डोळ्यात पाणी

रवींद्र पाटे
सोमवार, 22 जुलै 2019

कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटो क्रेटची आवक पन्नास टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. आवक व मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याने टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे कांद नव्हे तर टोमॅटोच डोळ्यात पाणी आणणार अशी चिन्हे दिसत आहेत 

नारायणगाव (पुणे) : कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटो क्रेटची आवक पन्नास टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. आवक व मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याने टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे कांद नव्हे तर टोमॅटोच डोळ्यात पाणी आणणार अशी चिन्हे दिसत आहेत 

सोमवारी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम) सातशे रुपये ते आठशे रुपये असा या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला. जून महिन्यात रोज सुमारे एक लाख शेतकरी टोमॅटो क्रेटची आवक होत होती. मात्र, गेले दीड महिना ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत आहे. सुर्यप्रकाशाचा अभाव आहे. यामुळे टोमॅटोवर मोठ्या प्रमाणात लालकोळी, फळावर काळे ठिपके पडणे, चिरटा या कीड व बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. झाडांची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडली आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे. 

टोमॅटोच्या तोड्याला एकरी शंभर क्रेटचे उत्पन्न निघणे अपेक्षित असताना तीस ते चाळीस क्रेटचे उत्पादन निघत आहे. यामुळे येथील उपबाजारात टोमॅटो क्रेटची आवक निम्म्याने घटली आहे. टोमॅटो खरेदीसाठी देशभरातून सुमारे दोनशे व्यापारी येथील उपबाजारात दाखल झाले आहेत. व्यापाऱ्यांकडून सुमारे दीड लाख टोमॅटो क्रेटची मागणी असताना साठ ते सत्तर हजार शेतकरी टोमॅटो क्रेटची आवक होत आहे, अशी माहिती बाजार समितीचे संचालक निवृत्ती काळे, उपबाजाराचे प्रमुख शरद घोंगडे यांनी दिली. 

दिल्ली, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड भागातून येथील टोमॅटोला मोठी मागणी आहे. टोमॅटो खरेदीसाठी देशभरातील व्यापारी दाखल झाले आहेत. टोमॅटो पॅकिंग, निवड ही कामे करण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याकडे दहा ते पंधरा कामगार आहेत. मात्र, अपेक्षित टोमॅटो मिळत नसल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. सोमवारी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला सातशे रुपये ते आठशे रुपयांच्या दरम्यान उच्चांकी भाव मिळाला. दुय्यम टोमॅटो क्रेटला तीनशे रुपये ते चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. काळे ठिपके व चिरटा असलेल्या टोमॅटोचे प्रमाण वाढले आहे, असे टोमेटो पुरवठादार जालिंदर थोरवे यांनी सागितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomato Price Hike