वांग्याच्या झाडाला टोमॅटो; भोपळ्याला कलिंगड 

PNE19O97958.jpg
PNE19O97958.jpg

बारामती : कधीकाळी चित्रपटात "आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा' हे गाणे चर्चेत होते. त्यावेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भाजीपाल्याच्या बाबतीतही "कलम' हे तंत्र बारामतीत साकारले आहे. कृषिक प्रदर्शनातून राज्यभरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे हे तंत्र पाहायला मिळेल. त्यातून चाळीस फुटांपर्यंत उंच वाढणारे टोमॅटोचे रोप व काकडी वेल असेल किंवा वांग्याच्या खुंटावर टोमॅटो आणि भोपळ्याच्या खुंटावर कलिंगडाचे वेल बहरलेले दिसतील! 

बारामतीतील शारदानगर येथील कृषिक प्रदर्शनाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रदर्शनात भाजीपाल्याची ही उच्च गुणवत्तेची रोपे प्रत्यक्ष उत्पादनासह पाहायला मिळतील. गेल्या दोन वर्षांपासून इंडो- डच भाजीपाला गुणवत्ता केंद्रातून कलम केलेल्या भाजीपाल्याची रोपे शेतकऱ्यांच्या शेतात पोचली व अधिक उत्पादनाचे तंत्र शेतकऱ्यांना मिळाले. गावठी रोगकीडप्रतिकारक जातींवर सुधारित व संकरित जातींची कलमे करून भाजीपाल्याची रोपे येथे तयार केली जातात. कृषिक प्रदर्शनात या वर्षी राज्यभरातील शेतकरी नव्याने हा मंत्र अभ्यासणार आहेत. साहजिकच कमी क्षेत्रफळात अधिक उत्पादनक्षमता, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता, अधिक रोगप्रतिकारकक्षमता अशी वैशिष्ट्ये असलेल्या भाजीपाल्याचे तंत्र दुष्काळी भागातही शेतकऱ्यांना मोठा आधार ठरेल. 

मातीविना शेतीचे तंत्र 
पाण्याच्या अति वापरामुळे गेल्या काही वर्षांत जमिनी क्षारपड झाल्या. या क्षारपड जमिनींचा प्रश्‍न वाढत चालला आहे. अशा जमिनींसाठी खजूर, शुगरबीट हे पर्याय आहेतच, शिवाय या पुढील काळात मातीविना शेतीचे तंत्रही शेतकऱ्यांना स्वीकारावे लागणार आहे. त्यातूनच नारळाच्या भुश्‍श्‍यावर स्ट्रॉबेरी, काकडी, मिरची, टोमॅटो, वांगी असा भाजीपाला अगदी तीस टक्के पाण्यातच घेता येऊ शकतो किंवा आर्चिडसारखी फुलशेती केवळ नारळाच्या करवंट्यावरील सालींवरही फुलवता येईल. बारामतीच्या कृषिक प्रदर्शनात जिरायती भागातील कांदा, मक्‍यापासून ते स्ट्रॉबेरीपर्यंत सारीच पिके वेगळ्या तंत्राच्या माध्यमातून घेण्यासाठी शेतकऱ्यांना अभ्यासता येणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com