Pune Rains : पुणेकरांनो,सावधान! आज रात्री मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पुणे : पुण्यासह राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता पुणेे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, आज पुण्यात रात्री परत पावसाची शक्यता आहे. पुण्याला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले. मध्य रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरांमधील काही घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. 

पुणे : पुण्यासह राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता पुणेे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, आज पुण्यात रात्री पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्याला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले. मध्य रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरांमधील काही घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. 

येत्या २७ ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस राहणार असून काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह होण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तविली आहे. बंगाल व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस पडत आहे. 

पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावत आहेत. मतदानाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. पण, रात्री पुन्हा पाऊस सक्रिय झाला. रात्री बारा वाजल्यापासून पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, काही वेळांमध्ये रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वेगाने वाहू लागले. रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले. पाऊस थांबत नसल्याने या पाण्याची पातळी सातत्याने वाढ होती. अखेर रात्री दीड ते दोनच्या सुमारास शहरातील मध्य वस्तीतील पेठांसह उपनगरांमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. 

येरवडा येथील शांतिनगर, घोरपडी गाव, पद्मावती, मार्केटयार्ड, वाघोली, वानवडी-आझादनगर, बी. टी. कवडे रस्ता येथील घरांमध्ये पाणी शिरले. घरात पाणी शिरल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्याच वेळी कात्रज येथील नवीन वसाहत येथे पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला. धानोरी जकात नाका येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

पाच तासांमध्ये 42 मिलीमीटर पाऊस 
शहरात रात्री बारा वाजल्यापासून पावसाला सुरवात झाली. पण, त्या वेळी पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या. रात्री एक वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसाच्या सरी पडू लागल्या. पहाटे पाच वाजेपर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर पावसाने उसंत घेतली. पण, या पाच तासांमध्ये शिवाजीनगर येथील वेधशाळेत 42.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लोहगाव येथे नोंदला गेला. तेथे 56.4 मिलीमीटर पाऊस पडला. तर, पाषाण येथे 32 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. 

कात्रज तलाव पुन्हा भरून वाहिला 
शहरासह उपनगरांमध्येही रात्रभर पाऊस पडत होता. पेशवेकालीन कात्रज तलावाची पातळी वाढली. त्यामुळे तो भरून वाहू लागला. नवीन वसाहतीजवळून वाहणारा ओढा ओसंडून वाहत असल्याचे सकाळी दिसून आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tonight can be torrential rainfall Pune says IMD