तूरडाळीचा पुरवठा अनियमित; तरीही प्रशासनाकडे विक्रीची नोंद ?

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे शहरातील स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी तूरडाळ नियमितपणे पुरविली जात नाही. मात्र, सरकारी यंत्रणेत दर महिन्याला तूरडाळ विक्रीची नोंद होत असल्याचा आरोप केला जात आहे. जुलै महिन्यात तुरडाळीचा किलोचा भाव घटल्यानंतर मागणी वाढली आहे. प्रत्यक्षात दुकानदारांना चार ते पाच महिन्यांनंतर तूरडाळ उपलब्ध करून दिली गेली आहे. 
 

पुणे : पुणे शहरातील स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी तूरडाळ नियमितपणे पुरविली जात नाही. मात्र, सरकारी यंत्रणेत दर महिन्याला तूरडाळ विक्रीची नोंद होत असल्याचा आरोप केला जात आहे. जुलै महिन्यात तुरडाळीचा किलोचा भाव घटल्यानंतर मागणी वाढली आहे. प्रत्यक्षात दुकानदारांना चार ते पाच महिन्यांनंतर तूरडाळ उपलब्ध करून दिली गेली आहे. 

शासनाने खरेदी केलेल्या तूरडाळीची खुल्या बाजारात विक्री होत असल्याकडे "सकाळ'ने लक्ष वेधले आहे. यासंदर्भात पुण्यातील स्वस्त धान्य दुकानातील वस्तुस्थितीविषयी रेशनिंग दुकानदार संघटनेचे गणेश डांगी यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी पुण्यात तूरडाळीच्या मागणीएवढा पुरवठा होत नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, ""चार ते पाच महिन्यांपूर्वी पुण्यातील दुकानदारांना तूरडाळ उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर या महिन्यात तूरडाळ उपलब्ध केली गेली आहे.

पुण्यात साडेनऊशेच्या आसपास स्वस्त धान्य विक्रीची दुकाने असून, प्रत्येकाला शंभर ते दीडशे किलोइतकी तूरडाळ विक्रीसाठी दिली आहे. पूर्वी शिधापत्रिकेवर विकल्या जाणाऱ्या तूरडाळीचा प्रतिकिलोचा भाव हा 55 रुपये इतका होता. त्या वेळी खुल्या बाजारातील तूरडाळीएवढाच भाव असल्याने तुलनेत मागणी कमी होती. आता शिधापत्रिकेवर विकल्या जाणाऱ्या तूरडाळीचा भाव 35 रुपये केल्याने मागणीत वाढ झाली आहे. प्रत्येक शिधापत्रिकेवर एक किलो इतकीच तूरडाळ दिली जाते. जिल्हा प्रशासनाकडून मागणीएवढा पुरवठा होत नाही.''

Web Title: Toordal supply irregular