फाटक्‍या नोटांसाठीची व्यवस्थाही 'फाटकी'!

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

पुणे - फाटक्‍या नोटा बदलून घेण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत येणाऱ्या ग्राहकांना अधिकाऱ्यांकडून सेवा मिळण्याऐवजी टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. "तुमचे खाते ज्या बॅंकेत आहे तेथे जा‘, असा अजब सल्ला देऊन "फाटक्‍या‘ नोटा बदलून घेण्यासाठीची व्यवस्था "फाटकी‘ ठरत चालल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे - फाटक्‍या नोटा बदलून घेण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत येणाऱ्या ग्राहकांना अधिकाऱ्यांकडून सेवा मिळण्याऐवजी टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. "तुमचे खाते ज्या बॅंकेत आहे तेथे जा‘, असा अजब सल्ला देऊन "फाटक्‍या‘ नोटा बदलून घेण्यासाठीची व्यवस्था "फाटकी‘ ठरत चालल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या विभाग क्रमांक नऊमध्ये फाटक्‍या नोटा बदलून देण्याची सुविधा आहे. स्टेट बॅंकेवरील विश्‍वासापोटी ग्राहक दूरवरून येथे नोटा बदलून घेण्यासाठी येत असतात. मात्र त्यांच्या पदरी चांगल्या नोटा पडण्याऐवजी निराशाच पडत असल्याचे चित्र आहे. ज्या बॅंकेत ग्राहकांचे खाते असेल तेथे मात्र मुख्य शाखेत जा, असे सांगितले जाते. बॅंकेच्या या टोलवाटोलवीच्या उत्तरांनी ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एका ग्राहकाचे खाते डेक्कन जिमखाना येथील स्टेट बॅंकेच्या शाखेत होते. त्यांच्याकडील फाटक्‍या नोटा घेऊन ते संबंधित शाखेत गेले असता त्यांना मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला तेथील सहाय्यक शाखा प्रबंधकांनी दिला. त्याप्रमाणे मुख्य शाखेत गेले असता तेथील सहायक प्रबंधकांनी पुन्हा खाते असलेल्या ठिकाणी जाण्याचा अजब सल्ला दिला. यासोबत संबंधित बॅंकेकडून लेखी आणा, असे जणू फर्मानच सोडले. कोणतीही बॅंक फाटक्‍या नोटा बदलून देऊ शकते, असे असतानाही ग्राहकांना ही सुविधा नाकारण्यात येत आहे. काही ग्राहक नियमांची माहिती नसल्यामुळे अधिकारी सांगतील त्याप्रमाणे बॅंकांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. एकूणच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना मात्र डोकेदुखी झाली आहे.

नियमांची माहिती नसल्यामुळे अधिकारी सांगतील त्याप्रमाणे ग्राहक बॅंकांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत.

काय सांगतो नियम
रिझर्व्ह बॅंकेच्या नोटा आणि नाणी बदलून देण्याच्या प्रपरिपत्रक - आरबीआय/2013-14/91 डीसीएम (एनई) नं. जी - 4/08.07.18/2013 - 14 नुसार कोणत्याही रिझर्व्ह बॅंकेशी संलग्नित कोणत्याही बॅंका व त्यांच्या कोणत्याही शाखांकडे ही सुविधा उपलब्ध असेल. फाटक्‍या, खराब झालेल्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देण्याची जबाबदारी बॅंकांची असेल. आठवड्यातील दिवसांचा भेदभाव न करता सुटीचे दिवस वगळता कोणत्याही दिवशी नोटा बदलून देणे बॅंकांचे कर्तव्य आहे. जनहितार्थ कोणतीही बॅंक ही सुविधा नाकारू शकत नाही.

खराब किंवा फाटक्‍या नोटा बदलून देण्याची सुविधा खाते असलेल्या बॅंकांमध्ये उपलब्ध आहे. आम्ही त्यांना त्यांच्या बॅंकांमध्ये जाण्यास सांगतो. तसेच खाते असलेल्या बॅंकांनी नोटा बदलून देण्यास नकार दिला, तर त्यांच्याकडून लेखी घ्यावे.
- सुरेश गोसावी, उपप्रबंधक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, पुणे स्टेशन.

Web Title: torn currrancy replacement issue in sbi bank