स्वराज्याच्या 'तोरणा'कडे 'प्रचंड' दुर्लक्ष (व्हिडिओ)

torna fort
torna fort

लोखंडी रेलिंग व अंबरखान्याच्या छताची दुरवस्था; दुरुस्तीवरील निधी पाण्यात

वेल्हे (पुणे) : हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू असणाऱ्या तोरणागडाच्या दुरुस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गडावरील लोखंडी रेलिंग व मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या अंबरखान्याचे छत यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे पुरातत्त्व खात्याने केलेला कोट्यवधींचा निधी पाण्यात जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

तोरणा गडावर पुरातत्त्व खात्याकडून मागील दोन वर्षांपासून डागडुजीची कामे सुरू आहेत. परंतु पुरातत्त्व खात्याच्या गलथान कारभारामुळे गडावर निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. तोरणागडावरील मुख्य दरवाजा असणाऱ्या बिन्नी दरवाजाची तटबंदी अत्यंत धोकादायक बनली आहे. कोणत्याही क्षणी ती ढासळण्याची शक्‍यता आहे. मुख्य तटबंदीला मोठमोठे भगदाड पडल्याचे स्पष्ट दिसत असतानाही त्याकडे पुरातत्त्व खाते दुर्लक्ष करीत आहे. वेल्ह्याचे माजी शिवसेनाप्रमुख दत्तात्रेय देशमाने व वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य विकास गायखे हे वारंवार या गोष्टींकडे पुरातत्त्व खात्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.

गडावर जाणाऱ्या मुख्य मार्गावरील धोकादायक ठिकाणी लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) उभे करण्यात आले आहेत. एका वर्षाच्या आतच कठडे उन्मळून पडल्याने ठेकेदाराकडून झालेल्या कामाचा निकृष्ट दर्जा लक्षात येतो. येथे दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी, दुर्ग अभ्यासक, परदेशी पर्यटकांची रेलचेल चालू असते.

स्वच्छतागृहाची वानवा
तोरणा गडाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटक व मेंगाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या आबालवृद्ध व महिला भक्तांसाठी मात्र अद्याप स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध नसल्याने कुचंबणा होते. ही बाब पुरातत्त्व खात्याच्या नजरेसमोर अनेक वेळा आणून देखील स्वच्छतागृहाची सोय करण्यात आलेली नाही.

किल्ल्यावरील काही दुर्घटना

  •  उत्तर प्रदेश येथील दोन युवकांचा तोरणा किल्ल्यावरील कड्यावरून खाली कोसळून मृत्यू. मृतदेह शोधण्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण. या युवकांचे मृतदेह ५ दिवसांनी सापडले. मृतदेह शोधणाऱ्यांना २ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
  •  १९ फेब्रुवारी २०१६ - सातारा येथील युवकाचा किल्ल्यावर चढताना दरीत कोसळून मृत्यू.
  •  १८ जून २०१७ - पुण्यातील ‘तरुण बब्रुवान कापसे’ हा युवक पाय घसरून कड्यावरून कोसळला. गंभीर जखमी.
  •  २५ ऑगस्ट २०१७ -  पुण्यातील सिंबायोसिस कॉलेजमधील यशवंत गोल्लापुडी याचा गडावरील तलावात बुडून मृत्यू.

किल्ल्याच्या डागडुजीसाठी...
४,७६,८५,६४६
मंजूर निधी

३,६५,१९,६९५
खर्चीत निधी

१,११,६५,९५१
शिल्लक निधी
(आकडे कोटी रुपयांत)

ठेकेदाराचे नाव - ओसवाल बिल्डर्स सातारा
केलेली कामे - तटबंदी, बारुदखाना, लक्कडखाना, पाथ वे, लोखंडी रेलिंग, कोकण दरवाजा ते बुधला माची, झुंजार बुरूज.
शिल्लक कामे - उर्वरित तटबंदी, नादुरुस्त लोखंडी रेलिंग, कोकण दरवाजा ते बिन्नी दरवाजापर्यंतचा भाग.
कामाचा कालावधी -
२०१६ ते २०१८

अंबरखान्याचे काम मी पदभार घेण्यापूर्वी पूर्ण झाले होते. वाऱ्यामुळे ते उचकटले गेले असून चालू कामात त्याची दुरुस्ती करण्यात येईल. बिन्नी दरवाजाचे काम अतिशय जिकिरीचे असून, दुसऱ्या टप्प्यात पंधराव्या वित्त आयोगातून निधीची मागणी करण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात मोठे दगड पडून काही ठिकाणी रेलिंग नादुरुस्त झाली आहे. नोव्हेंबर २०१८ अखेर त्याची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच शौचालयासाठी महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थेचे प्रस्ताव आले असून संचालकांकडून मंजुरी मिळताच शौचालयाचे काम मार्गी लावण्यात येईल.
- विलास वाहणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग

नवरात्रीनिमित्त अनेक महिला गडावर येतात. गडावर जाण्यासाठी बनवलेला रस्ता अतिशय अरुंद असून, एकावेळी एकच वाहन त्यावरून जाऊ शकते. अतिशय तीव्र उतार व संरक्षक कठड्यांचा अभाव यामुळे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. रस्त्याचे रुंदीकरण व शौचालयाची व्यवस्था संबंधित खात्याने तातडीने पूर्ण करून महिला व पर्यटकांची हेटाळणी थांबवावी; अन्यथा तालुक्‍याच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल.
- संगीता जेधे, सभापती, वेल्हे

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४६ मध्ये तोरणागड हस्तगत करून हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. त्या गडाच्या डागडुजीकडे जर अक्षम्य दुर्लक्ष होत असेल व निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेची दिशाभूल करीत असतील, तर तमाम शिवप्रेमी व शिवसैनिकांच्या वतीने पुरातत्त्व कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.
- दत्तात्रेय देशमाने, माजी शिवसेना तालुकाप्रमुख, वेल्हे

तोरणागडावर रात्रीच्या वेळी अनेक ट्रेकर्स मुक्कामी असतात. त्यांना स्वच्छतागृहाची सोय नसल्याने मेंगाईदेवी परिसर व शंकराच्या मंदिराभोवतीचा परिसर अस्वच्छ होतो. त्यामुळे गडकिल्ल्यांची होणारी विटंबना पुरातत्त्व खात्याने वेळीच रोखावी; अन्यथा तोरणागडावर प्रवेश बंद करून पुरातत्त्व विभागाविरोधात वेल्हे ग्रामस्थांच्या वतीने एल्गार पुकारण्यात येईल.
- विकास गायखे, ग्रामपंचायत सदस्य, वेल्हे बुद्रुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com