जाना था इंडोनेशिया; पहुँचे महाबळेश्‍वर

Enjoy
Enjoy

पुणे - सन १९७७ च्या दहावीच्या बॅचमधील वर्गमित्रांनी परदेशात ‘टूर’ काढून ‘एन्जॉय’ करण्याचा प्लॅन केला. इंडोनेशियातील बाली शहराला सगळ्यांची पसंती मिळाली. हौशी मित्रांनी विमानाच्या बुकिंगसाठी ट्रॅव्हल कंपनीकडे नोंदणी केली अन्‌ ३० जणांनी प्रत्येकी ४६ हजारांप्रमाणे १२ लाख रुपये भरले. परदेशवारीचा मुहूर्त ठरल्याने सगळ्यांनी जोरदार तयारीही केली. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या निरोपानुसार ही मंडळी रविवारी (ता. २७) दुपारी इंडोनेशियाला जाण्यासाठी येरवड्यात पोचली. तिथे खासगी बसची सोय असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, ना तिथे बस होती ना विमान प्रवासाचे बुकिंग... कंपनीने गंडविल्याने बालीतला एन्जॉय फसल्याचे या मित्रांच्या लक्षात आले. तेव्हा, महाबळेश्‍वरात जाऊन या मंडळींनी धमाल केली. त्यामुळे ‘जाना था इंडोनेशिया, पहुँचे महाबळेश्‍वर’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

हडपसरमधील साधना विद्यालयातील ३०-३५ माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप दरवर्षी सहलीसाठी जातो. त्यानुसार यंदा बालीला जाण्याचा निर्णय झाला. त्यासाठी सिंहगड टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीकडे नोंदणी केली. बालीत पाच दिवस धमाल करण्याचा बेत या ग्रुपचा होता. त्यावर ही मंडळी महिनाभर रोज चर्चा करायची. घरातली व्यक्ती इंडोनेशियाला जाणार असल्याने कुटुंबीयांनी खानपानापासून सर्व तयार केली होती. 

मुंबईत रविवारी सायंकाळी विमान गाठायचे असल्याने त्या दिवशी दुपारी ही मंडळी कंपनीच्या सांगण्यानुसार येरवड्यात पोचली; पण तिथे बसची व्यवस्था नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा कंपनीच्या मालकाच्या वडिलांचे निधन झाल्याने ‘टूर’ रद्द झाल्याचे सांगण्यात आले. संतापलेल्या या मित्रांनी पोलिस ठाणे गाठले. मालकाचा शोध घेऊन चोपही दिला, तेव्हा २८ जणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर महाबळेश्‍वरला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अशा प्रकारे आणखी ४० ते ४५ जणांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. 

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी कंपनीचा मालक सचिन विष्णू गायकवाड (रा. आंबेगाव) याला अटक केली आहे. याप्रकरणी प्रकाश शिवरकर (रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

वर्षाकाठी पुण्याबाहेर सहलीला जाण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यानुसार इंडोनेशियात जायचे ठरले होते. वेळेत पैसे भरून नोंदणीही केली होती. पण कंपनीने आमची फसवणूक केली. त्यामुळे बालीला जाता आले नाही. मात्र, त्यावर फार काही विचार न करता आम्ही महाबळेश्‍वरला जाऊन ‘एन्जॉय’ केला.  
- राजेंद्र किसन मोरे, हडपसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com