खेडमधील पावसाळी पर्यटनावर यंदा परिणाम

राजेंद्र लोथे
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील मंदोशी घाटात भूस्खलन होऊन रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. पावसाळ्यात लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या व्यावसायिकांना यंदा मोठा फटका बसला आहे.

चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील मंदोशी घाटात भूस्खलन होऊन रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. पावसाळ्यात लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या व्यावसायिकांना यंदा मोठा फटका बसला आहे.

पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून कोसळणारे नयनरम्य धबधबे, चासकमान धरणाचा विस्तीर्ण जलाशय व निसर्गपर्यटन करता करता श्री क्षेत्र भीमाशंकरचेही दर्शन घेता येते. चालू वर्षी दमदार पाऊस सुरू होताच पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात या पट्ट्यात सुरू झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यटक येणार व आयत्या वेळेस कच्चा माल कमी पडायला नको म्हणून जवळपास चार महिन्यांचा माल व्यावसायिकांनी भरून ठेवला. पर्यटन सुरूही झाले. मात्र, 27 जुलै रोजी मंदोशी घाटात मुसळधार पावसाने भूस्खलन होऊन रस्ताच खचल्याने या मार्गावरून वाहतूक ठप्प झाली.

भीमाशंकरला जाण्यासाठी टोकावडे-कारकुडी मार्गे रस्ता आहे. मात्र, या मार्गावर काही अवघड वळणे असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते, त्यामुळे येथून जाण्यास चालक तयार नसतात. त्यामुळे मंदोशी घाटात रस्ता खचल्याचा सगळ्यात मोठा फटका व्यावसायिकांना बसला आहे. चासकमान धरणापासून ते थेट मंदोशी, भोरगिरीपर्यंत शेकडो लहान-मोठे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक संपूर्ण वर्षात फक्त पावसाळी पर्यटनावर अवलंबून असतात.

पानटपरी, वडापाव, चहा, शेंगा, मक्‍याची कणसे यासह शाकाहारी व मांसाहारी जेवणाची हॉटेल्स केवळ पर्यटकांवर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षांपासून या पट्ट्यात सोमवार, गुरुवार, शनिवार व रविवार या दिवशी छोट्या टपरीचालकांना चार ते पाच हजार, दुकानदारांना आठ ते बारा हजार, हॉटेल चालकांना तीस ते पस्तीस हजार रुपये सरासरी धंदा होत असे. मात्र, चालू वर्षी हजार रुपये गल्ला होणेही मुश्‍कील झाले.

कर्ज कसे फेडायचे याची चिंता
याबाबत बोलताना वाडा येथील झाकिर तांबोळी, सुनील पावडे, शुभम केदारी, विलास पोखरकर, शिरगाव येथील संजय शिर्के यांनी सांगितले, की या चार महिन्यांत पर्यटकांना सेवा देताना आम्हाला वेळ कमी पडतो. मात्र चालू वर्षी बजेटच कोलमडले आहे. लाखो रुपयांचा भरलेला कच्चा माल, विक्रीसाठी आणलेल्या वस्तू यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism Bussiness Affected