येळवळी गावची पर्यटकांना साद

राजेंद्र लोथे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नयनरम्य निसर्गसौंदर्य, कोसळणारे धबधबे, ऊन-पावसाचा खेळ, डोंगररांगावर उतरलेले ढगांचे पुंजके व दाट धुक्‍यात हरवताच क्षणात स्वच्छ होणारे वातावरण, डोंगराच्या पायथ्याशी वाहणारे भीमा नदीचे पात्र, दाट वनराई. हे वर्णन आहे खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील येळवळी गावाचे.

चास (पुणे) : नयनरम्य निसर्गसौंदर्य, कोसळणारे धबधबे, ऊन-पावसाचा खेळ, डोंगररांगावर उतरलेले ढगांचे पुंजके व दाट धुक्‍यात हरवताच क्षणात स्वच्छ होणारे वातावरण, डोंगराच्या पायथ्याशी वाहणारे भीमा नदीचे पात्र, दाट वनराई. हे वर्णन आहे खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील येळवळी गावाचे.

ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी येळवळी येथे जायलाच हवे. भातखाचरांमधून मार्गक्रमीत होणारी वाट निसर्गाचा आनंद देण्यास सुरवात करते. भीमा नदीवरील पूल पार करून डोंगराची साधारण एक किलोमीटरची चढण चढताना नयनरम्य निसर्गाचा अनुभव येण्यास सुरवात होते. निम्मा डोंगर चढून गेल्यावर सभोवतालची घनदाट झाडी, डोंगरावर उतरलेले पांढरेशुभ्र ढग, डोंगराच्या पायथ्याला वाहणारे भीमा नदीचे पात्र, पक्षांचे येणारे वेगवेगळे आवाज व क्षणात दाट धुक्‍यात हरवणारा संपूर्ण डोंगर व क्षणार्धात सर्वत्र स्वच्छ होणारे वातावरण हे सर्व अनुभताना खरच आपण खेड तालुक्‍यातच आहोत का? यावर विश्‍वास बसत नाही. डोंगरावर स्थित येळवळी गावात गेल्यावर दिसणारी वस्ती व आपुलकीने बोलणारी माणसे स्वागताला तयार असतात. येथे तुम्हाला जेवण, मुक्कामासाठी तंबू व फिरण्यासाठी व परिसराची माहिती देण्यासाठी गाईडही उपलब्ध आहेत. गावापासून एक किलोमीटर डोंगरावरील सपाटीवरून पुढे गेल्यावर निसर्गाचा खरा आनंद म्हणजे कोकण कडा पाहायला मिळतो. या कड्यावरून आपल्याला कलावंतीणीचा महाल, पेठचा किल्ला (कोथळ गड), तुंगीचा सुळका, माथेरानचे डोंगर, रिटर्न फॉल व सगळ्यात नयनरम्य म्हणजे या कड्यावरून सूर्यास्त पाहणे म्हणजे येथे आल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होते. गेल्या काही वर्षांत विविध संस्थांनी व व्यक्तींनी येथील नागरिकांना केलेल्या सहकार्यामुळे नागरिकांकडून पर्यटकांना नानाविध सुविधा उपलब्ध झाल्या असून पर्यटकांची संख्याही वाढली आहे. जंगल सफारी व एक दिवसाच्या मुक्कामासाठी हे अतिशय सुंदर व सुरक्षित ठिकाण आहे.

येळवळी गाव कोठे आहे ?

  • भोरगिरीच्या पुढे व भीमाशंकरच्या कुशीत
  • पुण्यापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतर
  • खेड तालुक्‍याच्या पश्‍चिमेस भोरगिरी येथे उतरून पायी वेळवळीला जाता येते
  • भीमा नदीवरील पूल पार करून डोंगराचा साधारण एक किलोमीटरचा चढ

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism In Khed Tehsil