‘ठंडा ठंडा कूल कूल’ला खास पसंती

मीनाक्षी गुरव
शनिवार, 1 एप्रिल 2017

पुणे - उन्हाळा सुरू झाला की, सर्वांनाच वेध लागतात ते पर्यटनाचे. हल्ली सहकुटुंब ऐवजी बच्चेकंपनी, आई-वडील, आजी-आजोबा असे स्वतंत्ररीत्या पर्यटनाला जाण्याच्या ट्रेंडची चलती आहे. देशांतर्गत पर्यटनासाठी अंदमान, काश्‍मीर, दार्जिलिंग, लेह-लडाख आणि देशाबाहेरील पर्यटनासाठी युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया येथील ‘कुल डेस्टिनेशन’चा पर्याय खास पसंतीस उतरत आहे.

पुणे - उन्हाळा सुरू झाला की, सर्वांनाच वेध लागतात ते पर्यटनाचे. हल्ली सहकुटुंब ऐवजी बच्चेकंपनी, आई-वडील, आजी-आजोबा असे स्वतंत्ररीत्या पर्यटनाला जाण्याच्या ट्रेंडची चलती आहे. देशांतर्गत पर्यटनासाठी अंदमान, काश्‍मीर, दार्जिलिंग, लेह-लडाख आणि देशाबाहेरील पर्यटनासाठी युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया येथील ‘कुल डेस्टिनेशन’चा पर्याय खास पसंतीस उतरत आहे.

काही पर्यटक राजस्थान, केरळ येथील ठिकाणांकडेही आकर्षित होत आहेत. ईशान्य भारत याबरोबरच व्याघ्र प्रकल्पांना पर्यटकांची अधिक पसंती मिळते. महाराष्ट्रात ताडोबा, पेंच हे व्याघ्र प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. जंगल सफरीप्रमाणेच कोकणात आंब्याचा हंगाम अनुभवण्यासाठी पर्यटकांकडून विचारणा होत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांमधील पर्यटनाचे नियोजन जानेवारी-फेब्रुवारीपासूनच सुरू होते. त्यासाठी दोन-तीन महिने आधीच बुकिंगही केले जाते. काश्‍मीर, सिमला, मनाली, दार्जिलिंग या ठिकाणांबरोबरच लेह-लडाखमध्ये जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. राज्यांतर्गत पर्यटनाच्या दरामध्येच परदेशी सहल होत असल्याने उन्हाळ्यात परदेशी पर्यटन वाढणार असल्याचे दिसून येते. युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका या देशांमधील ठिकाणांना पसंती दिली जात आहे.

कुटुंबाऐवजी स्वतंत्र पर्यटन
कुटुंबासमवेत एकत्रित पर्यटनाला जाण्याचा ट्रेंड आता बदलला असून बच्चेकंपनी, आई-वडील आणि आजी-आजोबा स्वतंत्रपणे आपापल्या वयोगटातील मंडळींसमवेत पर्यटनाला जाण्याचा पर्याय निवडत आहेत. पर्यटनाच्या या बदलत्या ट्रेंडविषयी ‘केसरी टूर्स’च्या संचालिका झेलम चौबळ म्हणाल्या, ‘‘आजकाल बारा-पंधरा वर्षांची मुले-मुलीही आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत पर्यटनाला जाण्याचे नियोजन करत आहेत. साहसी आणि उपक्रम, शिबिर यावर आधारित पर्यटनाला बच्चेकंपनीकडून खास पसंती दिली जात आहे.’’

काही वर्षांपूर्वी नागरिक वर्षातून एकदा पर्यटनाला जात होते. ते आता वर्षातून दोन-तीन वेळा पर्यटनाचा आनंद घेत आहेत. त्यासाठी सात ते दहा दिवसांच्या सहलीचे नियोजन केले जात आहे. उन्हाळ्यामुळे पर्यटकांना थंड हवेचे पर्याय दिले जातात; परंतु काही पर्यटक याच काळात राजस्थान, केरळ, श्रीलंका येथे जाण्यास पसंत करत आहेत. एप्रिल-मे महिन्यातील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील कडक हिवाळा अनुभवण्याचे नियोजन पर्यटक करत आहेत.
- झेलम चौबळ, संचालिका, केसरी टूर्स

Web Title: tourist demand to cool place